हिंगोलीत वादळी वाऱ्यासह बरसला पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्‍यानंतर दुपारी अडीच वाजेपर्यंत कडक ऊन पडले. त्‍यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. हिंगोली शहरासह तालुक्‍यातील बळसोंड, अंधारवाडी, सिरसम, बासंबा, खांबाळा आदी गावांत पाऊस झाला. 

हिंगोली : जिल्‍ह्यात हिंगोलीसह कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत तालुक्‍यातील काही गावांत गुरुवारी (ता. १४) दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. शहरालगत असलेल्या अकोला बायपास व बळसोंड भागात अर्धा तास झालेल्या पावसाने रस्‍त्‍यावर पाणी वाहिले होते.

काही दिवसांपासून तापमान कमी अधिक होत आहे. कधी ढगाळ वातावरण राहात आहे. काही दिवसांपूर्वी वसमत तालुक्‍यात चांगला पाऊस झाला होता. त्‍यानंतर हिंगोली शहरातदेखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

हेही वाचा - कोरोनाच्या संकटातही शोधली रोजगाराची संधी

अर्धा तास जोरदार पाऊस

 दरम्‍यान, गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्‍यानंतर दुपारी अडीच वाजेपर्यंत कडक ऊन पडले. त्‍यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. हिंगोली शहरासह तालुक्‍यातील बळसोंड, अंधारवाडी, सिरसम, बासंबा, खांबाळा आदी गावांत पाऊस झाला. या वेळी वादळी वारेदेखील सुटले होते. शहरालगत असलेल्या अकोला बायपास व बळसोड येथे अर्धा तास जोरदार पाऊस झाला.

वीजपुरवठा खंडित

सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव, सवना, साखरा तसेच औंढा नागनाथ शहरासह तालुक्‍यातील गोळेगाव येथे रिमझीम पाऊस झाला. या वेळी वारे सुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. कळमनुरी शहरासह तालुक्‍यातील बोल्‍डा, पोतरा, येहळेगाव गवळी, असोला येथेदेखील विजेच्या कडकडांसह पंधरा मिनिटे पाऊस झाला.

शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली

 वसमत शहरासह तालुक्‍यातील गिरगाव, परजाना, खाजमापूरवाडी, सोमठाणा, बोरगाव बुद्रुक, पार्डी, डिग्रस खुर्द येथे पाऊस झाल्याने शेतात वाळत ठेवलेली हळद झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. वातावरणातील बदलाने शेतकरी मशागतीच्या कामाला लागले असून खरिपाच्या पेरणीसाठी खत, बियाणे, औषधींची खरेदी सुरू केली आहे.

वादळी वाऱ्याने गावकऱ्यांची त्रेधात्रिपीट

जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह काही वेळ पाऊस झाला. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामस्थांची चांगलीच त्रेधात्रिपीट उडाली. दोन दिवसांपासून काही भागात सायंकाळच्या सुमारास अचानक जोराचे वारे वाहत होते. गुरुवारी पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

येथे क्लिक करा - जाणकार म्हणतात, लघू उद्योगांना मिळणार चालना

मशागतीच्या कामांना वेग

जिल्हाभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी दिवसभर शेतातच राहणे पसंत करीत आहेत. शेतात दिवसभर असताना शेतातील कामांनाही उरक आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतातील काटेरी झुडपे तोडणे, वखरणी, नांगरणी सुरू केली आहे. आणखी पंधरा दिवसांत खरीपाची तयारी पूर्ण होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

बॅंकासमोर शेतकऱ्यांच्या रांगा

एकीकडे लॉकडाउन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे लॉकडाउनच्या काळात बहुतांश लाभार्थी शेतकरी बॅंकासमोर रांगेत उभे राहत असल्याचे चित्र आहे. मात्र, दिवसभर रांगेत थांबूनही पैसे काढण्यासाठी नंबर लागत नसल्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी बॅंकेत चकरा माराव्या लागत आहेत. पैसे हातात आल्यानंतरच शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदी करता येणार आहेत.       


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain with strong winds in Hingoli Hingoli news