तुळजापूर: वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले

जगदीश कुलकर्णी
रविवार, 15 एप्रिल 2018

शनिवारी रात्री अकराच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. याच सुमारास वादळी वारे सुरू झाले. या वादळी वाऱ्यामुळे शेकडो घरांवरील पत्रे उडून गेले. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले. विजेचे खांबही उन्मळून पडल्याने रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला.

तुळजापूर : वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अपसिंगा, कामठा, कात्री भागांत अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. फळपिकांचेही नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडल्याने या गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. शनिवारी (ता. १४) रात्री अकरापासून रविवारी (ता. १५) पहाटेपर्यंत या गावांना वादळी वारे, अवकाळी पावसाने झोडपले.

शनिवारी रात्री अकराच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. याच सुमारास वादळी वारे सुरू झाले. या वादळी वाऱ्यामुळे शेकडो घरांवरील पत्रे उडून गेले. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले. विजेचे खांबही उन्मळून पडल्याने रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडांखाली कैऱ्याचा सडा पडला होता. रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकाची काढणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी कडब्याच्या गंजी लावल्या आहेत. मात्र वादळी वाऱ्यामुळे कडब्याच्या पेंढ्या शिवारात उडून पडल्याचे चित्र होते. तालुक्यातील अपसिंगा, कात्री, कामठा, मोर्डा, बोरी भागांत रात्री वादळी वाऱ्याचा जोर होता.

दरम्यान, रविवारी सकाळी तहसीलदार राहुल पाटील यांनी अपसिंगा गावाला भेट देऊन पाहणी केली. महसूलच्या वतीने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

Web Title: rain in tuljapur