दुकानांत घुसले पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

औरंगाबाद - शहर व परिसरात मंगळवारी (ता.१०) दुपारी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे अनेक भागांतील तळघरात पाणी साचल्याचे प्रकार घडले. पुंडलिकनगरात काही दुकानांत पावसाचे पाणी घुसल्याचा प्रकार घडला. यात व्यापाऱ्यांनी सतर्कता बाळगत साहित्य बाजूला केल्याने मोठे नुकसान टाळता आले. 

औरंगाबाद - शहर व परिसरात मंगळवारी (ता.१०) दुपारी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे अनेक भागांतील तळघरात पाणी साचल्याचे प्रकार घडले. पुंडलिकनगरात काही दुकानांत पावसाचे पाणी घुसल्याचा प्रकार घडला. यात व्यापाऱ्यांनी सतर्कता बाळगत साहित्य बाजूला केल्याने मोठे नुकसान टाळता आले. 

मागील आठवडाभरापासून शहरात कधी ढगाळ वातारवण, तर कधी प्रचंड ऊन असे वातावरण होते. मंगळवारी शहर व परिसरात जोरदार पाऊस झाल्याने ऊन आणि उकाड्यापासून सर्वांना काहीसा दिलासा मिळाला. तर चाळिशीपर्यंत गेलेल्या तापमानात पावसामुळे घट झाली. बेमोसमी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने शहरात बाहेर पडलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली, तर बाजारपेठेत सुद्धा विक्रेत्यांपासून ग्राहकांना धावपळ करावी लागली. सायंकाळी साडेचारनंतर पावसास सुरुवात झाली. अर्धा तास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या पावसाचा फळबागांना फटका बसला आहे. मराठवाड्यात असलेल्या केशर आंब्यांच्या बागांचे नुकसान झालेले आहे.

दोन तास वीज गुल
वादळी वारा सुटल्याने शहरातील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन वीजपुरवठा पूर्ववत केला. वादळी वाऱ्यामुळे छावणी उपविभागाच्या ३३ केव्हीमध्ये बिघाड झाल्याने छावणी उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भागात जवळपास सहा ते सात तास वीजपुरवठा बंद होता, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणच्या सबस्टेशनचे फिडर बंद पडल्याने अनेक भागांत वीजपुरवठा बंद झाला होता. सिडको, एन-८, एन-३, एन-४, गारखेडा, पन्नालालनगर, चिकलठाणा औद्योगिक परिसर, सातारा परिसर, हिंदुस्थान आवास योजना या भागात दोन तास वीजपुरवठा बंद होता. तर छावणी उपविभागाअंतर्गत येणाऱ्या बगीचा हॉटेलजवळील ३३ केव्ही लाईनमध्ये मोठा बिघाड झाल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा जवळपास सहा ते सात तास बंद होता.

Web Title: rain water