फरश्‍या लावून अंगण झाकले, तरी पावसाचे पाणी जमिनीत मुरवाच!

Datta-Deshkar
Datta-Deshkar

औरंगाबाद - आपले अंगण स्वच्छ दिसावे, आकर्षक दिसावे यासाठी अंगणात फरश्‍या, टाईल्स बसवल्या जातात. अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक्‍स, काँक्रिटचा थरही दिला जातो; पण त्यामुळे गच्चीवरून खाली येणारे पावसाचे पाणी मुरण्याचा रस्ता बंद होऊन प्रत्येक कंपाउंडमधून पाण्याचा लोंढा रस्त्यावर येऊ लागला आहे. हे चुकीचे असून, प्रत्येक घरात, सोसायटीत जलफेरभरण आवश्‍यक असल्याचे मत जलतज्ज्ञ प्रा. दत्ता देशकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्याचबरोबर पाणी जिरवण्याचे सोपे तंत्रही सांगितले.

रांगते पाणी थांबते करा
प्रा. देशकर म्हणतात, ‘‘बहुतांश ठिकाणी सध्या वॉल टू वॉल रस्ते बनवले जात आहेत. खडीकरण, डांबरीकरण, सिमेंटचे रस्ते यामुळे कंपाउंडच्या बाहेरही पाणी मुरायला जागा राहिलेली नाही. थोड्या पावसातही घराघराच्या छतांवरून पडणाऱ्या पाण्याचे लोंढे रस्त्यावर येऊन वाहू लागतात. सखल जागेत पाण्याची तळी साचतात. हे टाळण्यासाठी ‘धावते पाणी चालते करा, चालते पाणी रांगते करा आणि रांगते पाणी थांबते करा’ या तत्त्वाचा वापर केला पाहिजे.’’

गवताची कामगिरी मोलाची
पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी करण्यात झाडे व वनस्पती फार मोलाची कामगिरी बजावतात. ज्या ठिकाणी झाडे जास्त असतात त्या ठिकाणी पाणी वाहण्याचा वेग कमी होतो. जमिनीवर गवताचे आच्छादन असेल तर पाणी चांगले मुरते. झाडाची मुळे खोलवर जाऊन कडक मुरूम व दगड फोडून फटी निर्माण करतात. त्यामुळे पाणी खोलवर मुरते. आता रस्त्याच्या कडेचे गवतच गायब झाल्याने माती वाहून जात मोठाले खड्डे पडले आहेत. शिवाय फुकट जलफेरभरणाचा हमरस्ताही आपण बंद करून टाकला आहे.

पाणी मुरवा, पाणी मिळवा
घरी बोअर असेल, तर त्यामध्ये गच्चीवरील पावसाच्या पाण्याचे फेरभरण करता येते. त्यासाठी अंगणाचा उतार तपासून त्याठिकाणी पाच फूट लांब, पाच फूट रुंद व आठ फूट खोल खड्डा खणा. त्यात खाली छोटे दगड, वर विटांचे तुकडे आणि त्यावर जाडी रेती यांचे समान थर टाकून खड्डा भरून टाका. सर्वांत वरती बारीक रेतीचा थर टाका. पाऊस सुरू झाल्यावर अंगणात जमा होणारे पाणी जमिनीत मुरायला सुरवात होईल. या फिल्टर बेडमधून पाणी गाळले जाऊन शुद्ध पाण्याला जमिनीतील प्रवाह बोअरकडे घेऊन जातील. तुमच्या घरी बोअर नसले, तरीही हा प्रयोग करा. पाणी जमिनीत मुरविणे हे एक सामाजिक व्रत आहे, असेही प्रा. देशकर कळकळीने सांगतात. 

बोअरवेल फेरभरण फायद्याचेच
अंगणात बोअर असेल तर त्याभोवती तीन फूट त्रिज्येचा गोलाकार आठ फूट खोल खड्डा करा. त्यात बोअरच्या केसिंग पाइपला छिद्रे करून तरट गुंडाळा. नंतर खड्ड्यात दगड, विटा व जाडी रेती यांचा भरणा करा. गच्चीवरून खाली आलेले पाणी वाहून जाण्याचा पाइप या खड्ड्याच्या तोंडापर्यंत आणून सोडून द्या. यामुळे बोअरमध्ये शुद्ध पाण्याचा भरणा होईल आणि मुबलक पाणी उपलब्ध होईल. ही सगळी तयारी उन्हाळ्यात करून ठेवायची असते. एकदा पाऊस पडला आणि पाणी उपलब्ध झाले, की लोक बेफिकीर होतात. पाणी नसते तेव्हा त्याची किंमत कळते; पण आताही वेळ गेलेली नाही. हा प्रयोग करायला फार वेळ लागत नाही. 

नक्की किती पाणी जमिनीत मुरते?
गच्चीवरील पाणी प्रत्यक्षपणे फिल्टर लावून बोअरमध्ये टाकण्याचे ठरवल्यास नक्की किती पाणी जमिनीत मुरते, याबद्दल प्रा. देशकर यांनी सांगितले, की गच्चीचा आकार १००० चौरस फूट व पावसाचे प्रमाण ७००

मिलिमीटर असेल, तर अंदाजे ५० हजार 
लिटर पाणी जमिनीत मुरते. बोअर नसेल, तरीही हा प्रयोग केला, तर जवळपास दोन लाख लिटर पाणी जमिनीत मुरू शकते. कंपाउंडच्या आत किंवा बाहेर ४० फूट लांबीचा चर खणून त्यात फेरभरण केले, तर एक लाख लिटरहून अधिक पाण्याचा जमिनीत निचरा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com