सिल्लाेड तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

तालुक्‍यात सर्वदूर परतीच्या पावसाने कहर करीत धुमाकूळ केला आहे. शनिवारी (ता.26) सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब होऊन वाहू लागले आहे. पावसाचा जोर रात्री वाढतच गेल्यामुळे पूर्णा नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात सर्वदूर परतीच्या पावसाने कहर करीत धुमाकूळ केला आहे. शनिवारी (ता.26) सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब होऊन वाहू लागले आहे. पावसाचा जोर रात्री वाढतच गेल्यामुळे पूर्णा नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. धानोरा (ता. सिल्लोड) परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रात असलेला कोल्हापुरी बंधाऱ्याचा मोठा भाग वाहून गेला आहे. यामुळे या ठिकाणी नदीने पात्र सोडल्यामुळे नदीकाठच्या शेतशिवारांतून पाणी वाहू लागले आहे. या ठिकाणी असलेले स्मशानभूमीचे सिमेंटचे शेड पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे जमीनदोस्त होऊन वाहून गेले आहे. तालुक्‍यातील तीन महसूल मंडळांत शनिवारी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

यामध्ये अजिंठा मंडळ 91 मिलिमीटर, भराडी 70 व आमठाणा मंडळात 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्‍याची पावसाची वार्षिक सरासरी 650 मिलिमीटर असून, आतापर्यंत महसूलदप्तरी 1010.89 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेरा वर्षांनंतर पावसाने 1000 मिलिमीटरची सरासरी ओलांडली आहे. याअगोदर 2006 मध्ये 1019.60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील शेतीमालाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला आहे. जिकडे पाहावे तिकडे शेतशिवारांत पाणीच पाणी दिसत आहे.

मागील तेरा वर्षांत पावसाने ओलांडलेली सरासरी
वर्ष        सरासरी पाऊस (मिलिमीटरमध्ये)

2006 - 1019.60
2010 - 799.60
2011 - 709.20
2013 - 834.25
2019 - 1010.89

दोन मंडळांत मागील चार दिवसांत दोनदा अतिवृष्टी
तालुक्‍यातील पर्जन्यमानाची सरासरी पावसाने ओलांडली असली तरी, काही महसूल मंडळांत पावसाने थैमान घातले आहे. मागील चार दिवसांत तालुक्‍यातील अजिंठा व भराडी या मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामध्ये बुधवारी (ता.23) अजिंठा व भराडी मंडळांत 95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर शनिवार (ता.26) पुन्हा अजिंठा मंडळात 91 मिलिमीटर, भराडी मंडळात 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall Increase Its Average In Sillod Taluka