अवकाळी पावसाचा फळपिकांना तडाखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मे 2020

मराठवाड्याच्या अन्य काही भागांतही पावसाने हजेरी लावली. 
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी परिसरात पावसासह गारपीटही झाली.

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या काही भागांत बुधवारी (ता. १३) दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

या पावसामुळे केळी, आंबा, कलिंगड, शेवगा आदी काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. मराठवाड्याच्या अन्य काही भागांतही पावसाने हजेरी लावली. 
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी परिसरात पावसासह गारपीटही झाली. बेंबळी परिसरातील केशेगाव, आंबेवाडी, विठ्ठलवाडी, उमरेगव्हाण, शिंदेवाडी, बामणी, वाडीबामणी येथे सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सरी कोसळल्या.

कळंब तालुक्यातील इटकूर, पाथर्डी, आथर्डी, भोगजी, हावरगाव, आडसूळवाडी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने आंब्यांचे नुकसान झाले. उमरगा तालुक्यातील केसरजवळगा परिसरात वादळी वाऱ्यामुळे गावातील माणिक बिराजदार यांच्या शेतातील काढणीला आलेली दोन एकरांवरील केळीची बाग भुईसपाट झाली. त्यात दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले.

परिसरातील आलूर, बेळंब, मुरूम, कोथळी, कंटेकूर, केसरजवळगा, वरनाळ, बोळेगाव, अचलेर, नाईकनगर भागातही पाऊस झाला. लोहारा शहर व परिसरात अर्धा तास पाऊस झाला. वादळामुळे लोहारा-कास्ती रस्त्यावर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. परंडा शहरासह परिसरात २० मिनिटे मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. उमरगा तालुक्यातील मुरूम, तुरोरी परिसरातही पाऊस झाला.

उदगीरचे आणखी चार रूग्ण कोरोनामुक्त, फुलांनी स्वागत करुन सोडले घरी

वादळी वाऱ्यामुळे फळबागांना फटका 
लोहारा शहर परिसरात बुधवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास वादळी वारे, मेघगर्जनेसह अर्धा तास अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली, तर फळबागांचेही मोठे नुकसान झाले. मागील काही दिवसांपासून तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे.

बुधवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होत सुमारे अर्धा तास वादळी पाऊस झाला. सायंकाळपर्यंत विजांच्या कडकडाटात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. वादळी वाऱ्यामुळे लोहारा, नागराळ, बेंडकाळ, मार्डी, मोघा शिवारातील झाडे उन्मळून पडली. या पावसामुळे आंबा, चिकू, द्राक्ष या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान अर्धा तास झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall in Osmanabad district