भर पावसाळ्यात  पाणी संकट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

औरंगाबाद - शहराला भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जायकवाडी येथे ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली असून, शुक्रवारी (ता. २०) सकाळी ११ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम चालणार आहे. या काळात सिडको भागाला पाणी मिळणार असले तरी जुन्या शहराचे वेळापत्रक एका दिवसाने पुढे जाणार आहे. 

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक गेल्या काही महिन्यांपासून कोलमडले आहे. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर नागरिक, नगरसेवकांनी थेट पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलने केली. त्यानंतर प्रशासनाने दोनऐवजी तीन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला; मात्र त्यानंतरही पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नसल्याने पुन्हा पूर्वीप्रमाणेच दोन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून पाइपलाइन फुटण्याचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यात रेल्वेस्टेशन व राजाबाजार भागत पाइपलाइन फुटली होती. त्यानंतर गुरुवारी (ता. १९) दुपारी ३.४० वाजता जायकवाडी येथे ७०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला मोठी गळती लागली. 

हा प्रकार लक्षात आल्यानंतर गळती तातडीने बंद करण्यात आली; मात्र दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत चालणार आहे. याच काळात फारोळा पंपगृहासमोर दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, शुक्रवारी सिडकोला पाणी मिळेल मात्र जुन्या शहराचा पाणीपुरवठा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे. 

Web Title: In the rainy season the water shortage