पावसाळ्यापुर्वीची थातुरमातुर कामे पथ्यावर, बारा-बारा तास वीज गुल...

गणेश पांडे  | Monday, 21 September 2020

परभणी शहरातील खंडोबा बाजार येथील हडको फिडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्युज कॉल सेंटरच्या तुघलकी कारभाराचा परिसरातील नागरिकांना गेल्या तीन महिण्यापासून त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापुर्वीची कामे थातुरमातुर पध्दतीने केल्यामुळे दररोज वारंवार विद्युत पुरवठा तासनतास खंडीत राहत आहे. असाच काहीसा प्रकार रविवारी अनुभवयास मिळाला. 

परभणी ः गेल्या तीन महिण्यापासून खंडोबा बाजार येथील हडको फिडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्युज कॉल सेंटरच्या तुघलकी कारभाराचा परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापुर्वीची कामे थातुरमातुर पध्दतीने केल्यामुळे दररोज वारंवार विद्युत पुरवठा तासनतास खंडीत राहत आहे. शनिवारी (ता.१९) रात्रीसह रविवारी (ता.२०) दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत होता.

परभणी शहरातील सुपर मार्केट येथे पुर्वी महापालिकेच्या जागेत मध्यवस्तीत असलेले हे फ्युज सेंटर जाणीवपुर्वक खंडोबा बाजाराच्या एका कोपऱ्यात नेण्यात आले. त्यामुळे छोट्या-मोठ्या कामांसाठी नागरिकांना अडचणीच्या व दुरच्या ठिकाणी असलेल्या सेंटरवर सहज पोचता येत नाही. भ्रमणध्वनी तर कायम बंद करून ठेवल्या जात असल्याने नागरिक, लोकप्रतिनिधी देखील त्रस्त झालेले आहे. 

हेही वाचा - परभणी जिल्हा ओलाचिंब, धरणे भरली, पिकांना फटका

झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडल्या
शनिवारी (ता.१९) झालेल्या पावसामुळे पावसाळ्यापुर्वी झाडांच्या फाद्यांची छाटणी न केल्यामुळे रात्री वीज गुल झाली. लोकमान्यनगरपासून ममता कॉलनीपर्यंतचा भाग अंधारात होता. मध्यरात्रीनंतर वीज आली. शनिवारी (ता.१९) जायकवाडी परिसरात झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडल्यामुळे तारा तुटल्या. त्यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीज बंद ठेवण्याची परवानगी घेतल्याचे सांगण्यात येते. परंतू, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, शाखा अभियंत्यांची उदासिनता व कायम कर्मचाऱ्यांचा हडेलहप्पीपणा व कंत्राटी कामगारांच्या बेफिकीरवृत्तीमुळे रात्री उशिरापर्यंत ही काम पूर्ण होऊ शकले नव्हते.

हेही वाचा - आमदार बाबाजानी दुर्रानी यांना जिल्हा बँकेचे संचालक पद पुन्हा बहाल   

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
या फ्युज कॉल सेटरचा ढिसाळ कारभार वारंवार दिसून येत असूनही कार्यकाही अभियंता असो की अधिक्षक अभियंता यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसुन येते. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. येथील अनेक कायम कर्मचारी स्वतः कामे न करता कंत्राटी कामगारांवर सोपवून नामानिराळे होतात. काहींनी तर स्वतःचे कामगार देखील ठेवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अशा कंत्राटी व रोजंदारी करणाऱ्यांवर हे सेंटर अवलंबून आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातात कारभार 
या फ्युज कॉल सेंटरबाबत असंख्य तक्रारी आहेत. परंतू, वरिष्ठ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या सेंटरवर कायम कर्मचारी असतांना ते पूर्णतः कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातात गेले आहे. अनेक महिण्यांपासून वारंवार व तासनतास विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. परंतू, त्याचे दायित्व कोणीही स्विकारत नाही. कोरोनाच्या काळात या परिसरातील नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार होते. परंतू, वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ते शक्य होत नाही. येथील अभियंता व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चांगल्या सेवा द्याव्यात नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील. - सचिन देशमुख, नगरसेवक.

संपादन ः राजन मंगरुळकर