"प्रभू'कृपेने मंजुरी मिळाली; सर्वेक्षण केव्हा सुरू होणार? 

विवेक पोतदार
मंगळवार, 21 मार्च 2017

जळकोट - झुक झुक झुक झुक..अगीनगाडी...धुरांच्या रेषा हवेत काढी... पळती झाडे पाहू या... मामाच्या गावाला जाऊ या... रेल्वेबाबतचे हे गीत एकेकाळी गाजले होते. आता विजेवर चालणाऱ्या रेल्वे आल्या तरी या गीताची गोडी कायम आहे. या गीताचा संदर्भ आहे तो लातूर रोड-बोधन या नव्या मार्गाशी. या मार्गाला मंजुरी मिळाली असली तरी सर्वेक्षण केव्हा सुरू होणार व प्रत्यक्षात धुरांच्या रेषा हवेत केव्हा निघणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

तालुक्‍यात रेल्वे सुरू व्हावी, यासाठी गेल्या पिढीपासून मागणी लावून धरण्यात आली. त्यानंतर "प्रभू'कृपेने त्याला मंजुरी मिळाली. त्यामुळे आता नवा लातूर रोड-हाळी हंडरगुळी-जळकोट-बोधन असा मार्ग तयार होणार असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे; परंतु अद्याप या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी कुठलाही निधी उपलब्ध न झाल्यामुळे हे काम रखडल्याचे चित्र आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी 19 लाख रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली असली तरी अद्याप त्याची सुरवात झाली नाही. निजामाच्या काळात या भागात रेल्वेच्या मार्गाचा सर्वे झाला होता, असे ज्येष्ठ मंडळी सांगतात; परंतु त्यानंतर अनेक वर्षे अशीच गेली. या मागणीकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे रेल्वेच्या सोयीपासून दूर राहिलेला हा भाग आहे. या मार्गामुळे चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, मुखेड आदी तालुक्‍यांतील जनतेची सोय होणार आहे. तसेच महाराष्ट्र-आंध्र प्रदेशला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. 

व्यापार, रोजगाराला मिळेल चालना 
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाला दिलेल्या मंजुरीमुळे शेकडो गावांना त्याचा फायदा होणार आहे. यामुळे मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या कामगारांना खासगी ट्रॅव्हल्स, एसटीऐवजी हक्काची रेल्वे उपलब्ध होणार आहे. यामुळे उद्योगधंदे, व्यापार, रोजगार आदींना चालना मिळणार असून विकासासाठी या मार्गाला महत्त्व येणार आहे. त्यामुळे तातडीने या मार्गाच्या सर्वेसाठीच्या निधीची उपलब्धतता करून मार्ग लवकर कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे. 

Web Title: raiway received approval