राज ठाकरेंच्या आवाहनाला तरुणाईने दिला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षबांधणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर आले असून, तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २१) त्यांनी सुभेदारी विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. श्री. ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो नव्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. आज कुणाचेही पक्षप्रवेश झाले नसल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

श्री. ठाकरे यांनी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी अर्जासह मला भेटावे, त्यांना संधी द्यायला मी तयार आहे, असे आवाहन केले होते. त्याप्रमाणे श्री. ठाकरे इच्छुकांना शनिवारी सुभेदारी विश्रामगृहावर भेटले.  माजी शहराध्यक्ष बिपीन नाईक, गौतम आमराव यांच्यापासून सुरवात करीत श्री. ठाकरे यांनी शहरातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

त्यानंतर मनसेच्या विविध पदांवर काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांची भेट घेतली. विद्यार्थी, प्राध्यापक, कंपन्यांच्या काही शिष्टमंडळांनीही आपापले प्रश्‍न श्री. ठाकरे यांच्यासमोर मांडले.

या वेळी राजू पाटील, अभिजित पानसे, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, हाजीसैफ शेख, राजेश येरुणकर, संदीप देशपांडे, हर्षल देशपांडे, सचिन मोरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर, विजय चव्हाण, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, उपाध्यक्ष आशिष सुरडकर, गजन गौडा पाटील, संतोष पवार, वैभव मिटकर, सुमित खांबेकर; तसेच महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

नगरसेविका विधाते, शिंदेही भेटीला
राज यांच्या भेटीला दिवसभर मान्यवरांची रेलचेल होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अंकिता विधाते आणि अपक्ष नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत राजू आमराव यांनी चर्चा केली. तर राहुल चाबुकस्वार यांनीही श्री. ठाकरे यांची भेट घेतली.

Web Title: raj thackeray marathwada tour youth politics