औरंगाबाद : राजस्थानच्या माजी आमदाराला बेड्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड या कंपनीचा चेअरमन व बसपाचा माजी आमदार बनवारीलाल कुशवाह याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानातील कारागृहातून हस्तांतरित करून अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. एक) करण्यात आली. सुमारे अडीच हजार गुंतवणूकदारांची दहा कोटींची फसवणूक केल्याचा त्याच्यासह अन्य संचालकांवर आरोप आहे.

औरंगाबाद - गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड या कंपनीचा चेअरमन व बसपाचा माजी आमदार बनवारीलाल कुशवाह याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानातील कारागृहातून हस्तांतरित करून अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. एक) करण्यात आली. सुमारे अडीच हजार गुंतवणूकदारांची दहा कोटींची फसवणूक केल्याचा त्याच्यासह अन्य संचालकांवर आरोप आहे.

माजी आमदार बनवारीलाल माधवसिंग कुशवाह, शिवराम कुशवाह, बालकिशन कुशवाह, (रा. सर्व धौलपूर, राजस्थान) तसेच इतर संचालक व पदाधिकाऱ्यांनी गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड, गरिमा होम्स, साथी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी या नावाने कंपन्या स्थापन केल्या. त्यांची कार्यालये महाराष्ट्रात ठिकठिकाणी थाटली. औरंगाबादेतील विशालनगर येथे वर्ष २०१० ला बन्सीलालनगर येथील विशाल मेगा मार्केटजवळ कार्यालय थाटले. कंपनीच्या नावाने विविध कार्यक्रम, बैठका घेऊन त्यांनी गुंतवणूकदारांना निमंत्रित केले. कंपनीत गुंतवणुकीबाबतचे प्लॅन समजावून सांगितले. तसेच प्लॉट व मुदत ठेव योजनेबाबत माहिती देऊन आकर्षक परताव्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ-मोठ्या रकमा कंपनीत गुंतवल्या. ठाराविक रकमेपर्यंत गुंतवणूक पूर्ण झाल्यास तो गुंतवणूकदारांना प्लॉट देणार होता. ज्यांना प्लॉट नको असेल त्यांना त्या पटीत रक्कम तो देणार होता. सुरवातीला त्याने काही गुंतवणूकदारांना परतावा दिला. त्यानंतर मात्र, वर्ष २०१४ ला कार्यालय बंद करून ते पसार झाले होते. या प्रकरणात अशोक बापूराव कुऱ्हे यांनी २२ जानेवारीला तक्रार दिली. यात पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले व त्यांच्या पथकाने सखोल तपास केला. त्यानंतर यात संशयितांविरुद्ध चिट ॲण्ड मनी सर्क्‍युलेशन सिक्कम (बॅनिंग) ॲक्‍टनुसार, गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर त्याला बुधवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई श्रीकांत नवले यांच्यासह गणेश शिंदे, कारभारी गाडेकर यांनी केली.

खुनाच्या गुन्ह्यातही हात 
बनवारीलाल कुशवाह एका खुनाच्या गुन्ह्यातही सहभागी होता. याप्रकरणात तो राजस्थानातील कारागृहात होता. औरंगाबादेतील गुन्ह्यात त्याला कारागृहातून हस्तांतरित करण्यात आले, अशी माहिती निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.

३४९ जणांचे जबाब नोंदवले
फसवणूक प्रकरणी औरंगाबादेतील आर्थिक गुन्हे शाखेकडे गुंतवणूकदारांनी धाव घेतली. यात ३४९ जणांचे जबाब नोंदवण्यात आले. जबाबानुसार, त्यांची तीन कोटी ४२ लाख तीन हजार ९२७ रुपयांची फसगत झाली. संशयितांनी सुमारे अडीच हजार जणांची दहा कोटींची फसवणूक झाल्याची बाब पोलिसांनी सांगितली.

Web Title: Rajasthan MLA Arrested Crime