आलिशान कारमध्ये होते ‘मिनी ऑफिस’!

Crime
Crime

औरंगाबाद - पेठे ज्वेलर्समधून अठ्ठावन्न किलो सोने लंपास करणारा मुख्य सूत्रधार राजेंद्र जैन याची निराला बाजार परिसरातील अपार्टमेंटमध्ये यक्ष कलेक्‍शन, बी अँड बी कलेक्‍शन, आनंद गारमेंट अशा तीन नावांनी व्यवसाय सुरू होते. तो पाच हजारांच्या साड्या खरेदी करणाऱ्या ग्राहकाला दहा ग्रॅमचा चांदीचा शिक्का भेट म्हणून द्यायचा. तसेच त्याने कारमध्ये ‘मिनी ऑफिस’ थाटले होते. ती आलिशान सेदान कार पोलिसांनी सिद्धार्थ गार्डनच्या वाहनतळातून ताब्यात घेतली.

जैनच्या कारच्या डिक्कीतून राणेची आतापर्यंतची पगारपत्रकेपोलिसांनी हस्तगत केली आहेत. शिवाय त्याने समर्थनगर येथील अपार्टमेंटमध्ये दोन कोटींचे दोन अालिशान फ्लॅटही विकत घेतले असल्याचे समोर आले आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्समधून २७ कोटींचे ५८ किलो सोने लंपास केलेल्या राजेंद्र जैनने सुरवातीला आईसाठी दहा ग्रॅमचे मंगळसूत्र खरेदी केले होते.

तेव्हापासून थोडे थोडे दागिने तो खरेदी करायचा. कधी उधारीवर सोने घेतल्यावर किमतीपेक्षा दोन ते तीन टक्के रक्कम तो व्यवस्थापक अंकुर राणेला देत होता. त्यामुळे राणेचा त्याच्यावर विश्वास बसला. पहिल्यांदाच त्याने पाव किलो सोने खरेदी केले होते. त्यानंतर त्याने राणेशी ओळख वाढवत ऑक्‍टोबर २०१८ मध्ये तब्बल पाच किलो सोने लांबवले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने जैनला अटक केल्यानंतर त्याच्या तीन कार जप्त केल्या. त्यापैकी वाहनतळावरून जप्त केलेल्या कारची तपासणी करण्यात आली. तेव्हा कारच्या डिक्कीतून चार बॅग हस्तगत करण्यात आल्या. त्यातून पोलिसांनी महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. पेठेंच्या दुकानातील दागिन्यांच्या रिकाम्या डब्यांवर जैनने स्वत:च्या बी ॲण्ड बी फर्मचे स्टिकर लावले होते. त्यात तो पाच हजारांच्या साड्यांच्या खरेदीवर ग्राहकांना दहा ग्रॅमचा चांदीचा शिक्का भेट द्यायचा. 

जैन मूळचा राजस्थानातील
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार राजेंद्र जैन हा मूळचा राजस्थानमधील रहिवासी आहे. त्याचे वडील धुळ्यातील शिरपूर येथे राहायला आले. २००१ ते २००५ या काळात जैन नाशिकला गेला होता. तेथे तो वाळूची दलाली करायचा. २००५ मध्ये तो औरंगाबादला आला. समर्थनगरातील बालाजी अपार्टमेंटमध्ये त्याने कापड विक्रीचा व्यवसाय सुरू केला. २०१७ मध्ये जैनने आईसाठी मंगळसूत्र खरेदी केले होते तेव्हा जैन आणि राणेची ओळख झाली.

थोडे थोडे दागिने खरेदी करताना जैन अधूनमधून पैसे उधार ठेवायला लागला. उधारीच्या पैशांची परतफेड करताना जैन दागिन्यांच्या किमतीपेक्षा दोन ते तीन टक्के रक्कम राणेला जास्त द्यायचा. राणेचा विश्वास बसल्याचे समजताच जैनने त्याच्याकडून पाव किलो सोने खरेदी केले. त्यानंतर ऑक्‍टोबर २०१८ मध्ये त्याने थेट पाच ते सहा किलो सोने दुकानाबाहेर काढले. त्यानंतर राणेला दागिन्यांत हिस्सा देण्याचे सांगत ५८ किलो दागिने जानेवारी ते मार्च २०१९ या काळात लांबवले. जैन दागिने देत नसल्याचे पाहून मग स्वत:च्या बचावासाठी राणेने दागिन्यांची बनावट बिले तयार केली. मात्र, हा प्रकार लेखा परीक्षणात समोर आल्याने दोघांचे पितळ उघडे पडले. तर जैनने समर्थनगरातील फ्लॅटच्या दरवाजाला ३५ गुन्हे दाखल असलेल्या गुंडाच्या नावाची नेमप्लेट लावली होती. तो गुंडाच्या संपर्कातही होता. याशिवाय त्याने त्या गुंडाला बॅंकेतून पैसेदेखील पाठवल्याचे समोर आले आहे. २०१७ मध्ये त्याची चौकशीही झालेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com