esakal | राजस्थान सरकारकडून लातूरच्या श्वेताचे कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

राजस्थान सरकारकडून लातूरच्या श्वेताचे कौतुक

राजस्थान सरकारकडून लातूरच्या श्वेताचे कौतुक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : कलाकुसरीच्या ऐतिहासिक वारशाने जगाला भुरळ पाडणाऱ्या राजस्थानात लातूरच्या श्वेता साळुंके हिने बनवलेले बोधचिन्ह (लोगो) झळकणार आहे. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या स्पर्धेत निवडलेला हा लोगो राजस्थान सरकारने स्वीकारला आहे. यासाठीचे प्रथम पारितोषिक अन् प्रशस्तिपत्र देऊन श्वेता आणि तिच्या मैत्रिणीचा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूरमध्ये गौरव केला आहे.

नियोजनबद्ध शहर व ग्रामविकास साधण्यासाठी व सरकारच्या सुविधा अधिक लोकाभिमुख होण्यासाठी राजस्थान सरकारने `प्रशासन गाँव और शहरो को संग अभियान -२०२१` हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निवारण, नियमांतील क्लिष्टता दूर करून प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे ध्येयही ठे‌वण्यात आले आहे. दरम्यान हे उद्देश लोकमनावर अधोरेखित होण्याकरिता आशयपूर्ण लोगोची गरज होती.

त्यासाठी राजस्थान सरकारने राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा घेतली. त्यात ११९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात लातूरचे हॉटेल व्यावसायिक प्रमोद साळुंके यांची कन्या, इंटेरियर डिझायनर श्वेता व तिची मुंबईतील वर्गमैत्रीण उपासना पांडे यांनी बनवलेला लोगो सर्वोत्कृष्ट ठरला. महात्मा गांधी जयंतीदिनी जयपूर येथे राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या हस्ते, नगरविकासमंत्री शांती धारीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिकाचे वितरण झाले. रोख ४० हजार व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्वेता ही सध्या बेल्जियममधील हॅसल्ट विद्यापीठात आर्किटेक्चरचे पदव्युत्तर शिक्षण घेत असून तिची मैत्रीण उपासना पांडे यांनी हा पुरस्कार श्वेताच्या वतीने स्वीकारला.

loading image
go to top