सदाभाऊंना माझे कार्यकर्तेच पुरेसे - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून भाजपवासी झालेल्या व सध्या कडकनाथ कोंबडी गैरव्यवहार प्रकरणातील सदाभाऊ खोत यांना माझे कार्यकर्ते पुरेसे आहेत,’’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे केली. तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरले, तर त्यांच्या विरोधात लढण्याचे त्यांनी जाहीर केले.

औरंगाबाद - ‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून भाजपवासी झालेल्या व सध्या कडकनाथ कोंबडी गैरव्यवहार प्रकरणातील सदाभाऊ खोत यांना माझे कार्यकर्ते पुरेसे आहेत,’’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे केली. तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरले, तर त्यांच्या विरोधात लढण्याचे त्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांच्या होणाऱ्या मुस्कटदाबीबद्दल आवाज उठविण्यासह अन्य मागण्यांसाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली येथील क्रांती चौकातून सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. यानंतर पत्रकारांनी त्यांना कडकनाथ कोंबडीप्रकरणी विचारले असता, ‘‘खोत यांचाच मुलगा त्यात आरोपी आहे, त्यामुळे याची चौकशी करावीच लागणार; अन्यथा ईडीच्या कार्यालयावर मोर्चा काढेन.’’ ‘सदाभाऊंच्या विरोधात निवडणूक लढणार का’, असे विचारले असता, शेट्टी म्हणाले, ‘‘त्यांच्यासाठी माझे कार्यकर्तेच पुरेसे आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी मतदारसंघाची चाचपणी करीत आहेत. जर ते निवडणुकीत उतरले तर आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार,’’ असे शेट्टी यांनी जाहीर केले.

‘‘मोठ्या कष्टाने एक-एक परीक्षा उत्तीर्ण झाले तरीही नोकरी देण्याऐवजी सरकार तरुणांच्या जिवाशी खेळतंय. आत्तापर्यंत सहन केलं; मात्र जर पोरं खवळली तर ते सरकारच्या नरडीचा घोट घेतील. तसेच आंदोलनादरम्यान, आमच्या आया-बहिणींकडे सरकारने वाकड्या नजरेने पाहू नये, अन्यथा आम्हाला तुमचे डोळे काढावे लागतील,’’ असा इशाराही शेट्टी यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty Aakrosh Morcha Politics