नदी जोड प्रकल्प राबविण्यासाठी मुख्यमंत्र्याशी बोलणार - रामदास आठवले

जलील पठाण
रविवार, 12 मे 2019

नद्या जोड प्रकल्प राबविण्यासाठी मी मुख्यमंत्र्याशी बोलणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 

औसा : पावसाळ्यात मुंबई, कोकण किनारपट्टी भागात पडलेला पाऊस हा समुद्रात जातो. परंतू समुद्रात जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडवून नद्या जोडून जर मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यात आणले पाणी तर येथील दुष्काळाचे कायमचे निर्मुलन होईल. गेल्या पंधरा वर्षापासुन मी हा विषय सातत्याने सभागृहात मांडत आहे. हे वाया जाणारे पाणीच या भागातील दुर्भीक्ष संपविणार असल्याने नद्या जोड प्रकल्प राबविण्यासाठी मी मुख्यमंत्र्याशी बोलणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 

आठवले हे रविवारी (ता. 12) औसा तालुक्यातील जयनगर या गावात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले होते. तेव्हा शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, या भागातील जनावरांना चारा, पाणी नाही. त्यामुळे जनावरे सांभाळणे मुश्किल झाले आहे. जर एखादी संस्था चारा छावणीसाठी पुढे येत असेल तर त्या संस्थेला शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. या भागात मोठे धरण होण्यासाठी आणि साठवण तलाव निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे. मीही एका खेड्यातूनच लोकसभेत गेलो असल्याने खेड्यातील लोकांच्या अडचणी मला जवळून माहिती आहेत. पाणीटंचाई आणि नापिकीने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असतांना जनावरांचा सांभाळ, मुला मुलींचे लग्न, त्याच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी शेतात चांगले उत्पन्न आले पाहीजे आणि त्यासाठी पाणी असले पाहीजे. 

या भागात मुळात पाऊसच कमी पडत असल्याने जेवढा पाऊस पडेल त्याचे नियोजन जलयुक्तच्या कामातून केले पाहीजे आणि ज्या भागात जास्तिचा पाऊस पडून पाणी वाया जाते तेथील पाणी या भागात वळवले तरच भविष्यात आम्हाला दुष्काळी दौरे काढण्याची नामुष्की येणार नाही. असेही ते म्हणाले. यावेळी कांही शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे भरुनही त्यांना विम्याचे संरक्षण देत नसल्याच्या तक्रारीवर आठवले यांनी विमा कंपनीशी बोलून हा प्रश्न मार्गी लावण्याचे अश्वासन दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athavale will talk to the Chief Minister to implement the River Connecting Projects