सत्तेत असल्यासारखे शिवसेनेने वागावे - आठवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

औरंगाबाद - शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रच राहायला हवेत. यासोबत शिवसेनेने सरकारमध्ये असल्यासारखे वागले पाहिजे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दिला.

औरंगाबाद - शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रच राहायला हवेत. यासोबत शिवसेनेने सरकारमध्ये असल्यासारखे वागले पाहिजे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दिला.

आठवले म्हणाले, 'नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षांत मोदी सरकारने अनेक चांगल्या योजना जाहीर केल्या. मोदी हे आरक्षणाच्या विरोधात असल्याचा चुकीचा प्रचार केला जात आहे. ते आरक्षणाच्या बाजूने आहेत. त्यांनी यापूर्वीच त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही घटनेने ज्यांना आरक्षण दिले, त्यांना विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे सरकार घटनाविरोधी म्हणणे योग्य नाही. आरक्षण हे पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक दिले जाऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उर्वरित पन्नास टक्‍क्‍यांतून मराठा, मुस्लिम, जाट किंवा अन्य जातींना आरक्षण देण्यासाठी 25 टक्के आरक्षणाचा कायदा केला; तर हा प्रश्‍नच संपुष्टात येईल.''

'शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, ही शिवसेनेची आणि विरोधी पक्षाची भूमिका रास्त आहे. मात्र त्यासाठी लागणारे तीस-पस्तीस हजार कोटी रुपये कसे उभे करावेत, हेही सांगितले पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्ती करण्याची सरकारची भूमिका आहे. शिवसेना सत्तेत राहून सत्ता विरोधी वक्तव्य करीत आहे, शिवसेनेने सत्तेत असल्यासारखे वागावे,'' असे आठवले यांनी नमूद केले.

रिपब्लिकन ऐक्‍यासाठी मंत्रिपदही सोडू
'रिपब्लिकन पक्षासाठी रिपब्लिकन ऐक्‍य काळाची गरज आहे, ऐक्‍य झाले तर आपण नेतृत्व करण्याच्या शर्यतीत राहणार नाही. वेळप्रसंगी मंत्रिपदाचा त्याग करायची तयारी आहे; पण ऐक्‍य झाले पाहिजे ही माझी भूमिका कायमच आहे. ऐक्‍य हे नेत्यांत नव्हे; तर आंबेडकरी जनतेत व्हावे,'' अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.

Web Title: ramdas athawale talking to shivsena