पीक विम्यावरुन रमेश आडसकरांनी अधिकाऱ्याला घेतले फैलावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

-  माजलगाव, वडवणी, धारुर आणि केज या चार तालुक्यांतील काही शेतकऱ्यांना अत्यल्प कारणांवरुन पीक विमा टाळला आहे.

- या प्रश्नावर सोमवारी (ता. २९) भाजप नेते रमेश आडसकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले.

बीड : माजलगाव, वडवणी, धारुर आणि केज या चार तालुक्यांतील काही शेतकऱ्यांना अत्यल्प कारणांवरुन पीक विमा टाळला आहे. या प्रश्नावर सोमवारी (ता. २९) भाजप नेते रमेश आडसकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले. ‘त्या’ शेतकऱ्यांना पीक विमा का टाळला, जर क्षेत्र जास्त असे कारण आहे तर संरक्षित रक्कम भरुन का घेतली, तेव्हाच का परत केली नाही अशा प्रश्नांचा भडीमार करत वंचित शेतकऱ्यांना पीक विमा भेटलाच पाहीजे, अन्यथा शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशाराही त्यांनी दिला.

प्रभारी जिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनीही कंपनीच्या अधिकाऱ्याला खडे बोल सुनावत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असे असंवेदनशिल वागू नका, त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि त्यांच्या हक्काचा विमा देण्यासाठी कार्यवाही 
करण्याच्या सुचना दिल्या. मागच्या वर्षी तिव्र दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल आहे. 
शेतकऱ्यांनी खिशातून कोट्यावधी रुपये मोजून खरीप पिकांचे विमा संरक्षण करुन घेतले. पीक विमा मंजूरही झाला. मात्र, माजलगाव, वडवणी, धारुर व केज या चार तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांना जादा क्षेत्र, गावांच्या नावात, खाते क्रमांकात चुका अशा कारणांनी विम्या पासून वंचित ठेवले आहे.

शेतकरी चकरा मारुन हैराण असताना त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. हवालदिल शेतकऱ्यांसह सोमवारी भाजप नेते रमेश आडसकर सोमवारी बीडला आले. कंपनी अधिकाऱ्याला थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर नेत प्रश्न कानावर घातले. विमा टाळण्यासाठी सांगीतले जाणारे कारणे संयुक्तीक नसल्याने विमा मिळालाच पाहिजे अशी मागणी केली. 

दरम्यान, शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घ्या, शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर असंवेदनशिल राहू नका असे सुनावत विमा भेटण्याची प्रक्रीया तत्काळ करण्याच्या सुचना दिल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तालुका स्तरावर एक खिडकी योजना सुरु करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh Adaskar get angry on officer related to crop insurance

टॅग्स