पूरग्रस्तांसाठी रमेश आडसकरांची पाच लाख रूपयांची मदत

रामदास साबळे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

वडीलांच्या स्मृती जागवत  माणूसकीचा हात

केज : राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात पूर परिस्थितीने हाहाकार माजवला आहे. अशा संकटात सापडलेल्या जनतेला प्रत्येक क्षणाला मदतीची गरज आहे. याची जाणीव ठेवून आपले दिवंगत वडील आणि लोकनेते माजी आमदार बाबुराव आडसकर यांच्या पुण्यस्मणार्थ रमेश आडसकर यांनी सोमवार (ता.१२) पाच लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना दिली.

तालुक्यातील आडस येथे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे हा पाच लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.

जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या विशिष्ट रांगड्या शैलीने ग्रामीण जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिवंगत माजी आमदार बाबुराव आडसकर यांच्या तृतीय पुण्यस्मणार्थ आडस येथे सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. ज्यांनी आपल्या राजकीय जीवनात सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून राजकारण केले. त्या आपल्या वडीलांच्या पुण्यस्मणार्थ आयोजित कार्यक्रमात पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी भाजप नेते आणि अंबा कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ऋषीकेश आडसकर यांनी पाच लाख रूपये मदतीचा धनादेश पालकमंत्र्यांना सुपूर्द केला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव पंडीत, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, माजी मंत्री  बदामराव पंडीत, आमदार संगीता ठोंबरे, आर. टी. देशमुख, भिमराव धोंडे, माजी आमदार मोहन सोळंके, साहेबराव दरेकर, केशव आंधळे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती संतोष हांगे उपस्थित होते.

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील जनतेला पूराचा जोराचा फटका बसला आहे. सध्या तेथील जनतेला मदतीचा हात देणे हा आपला माणूसकीचा धर्म आहे. ही मनाशी दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून आडसकरांनी वडीलांच्या स्मृती जागवत पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत मदतीची खऱ्या अर्थाने गरज असलेल्या पूरग्रस्तांसाठी पाच लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे देऊन मदतीचा हात दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh Adaskar gets Rs 5 lakh for flood victims