बीड : मराठवाड्याचा रंगकर्मी प्रा. केशव देशपांडे कालवश

Beed News
Beed News

अंबाजोगाई (बीड) : मराठवाड्याचा रंगकर्मी व अंबाजोगाईची नाट्य परंपरा वृध्दींगत करणारे प्रा. केशव देशपांडे यांचे रविवारी (ता.१४) पहाटे येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सकाळीच येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार झाले. त्यांनी दिग्दर्शित केलेली अनेक नाटके व एकांकिका आजही अनेकांच्या आठवणीत आहेत. या आठवणींना उजाळा देत कलावंतासह नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतलेले प्रा. केशव देशपांडे प्रारंभी ( १९७४) योगेश्वरी महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक होते. त्यानंतर योगेश्वरी संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख झाले. त्यांनी आपल्या कार्यकालात अनेक विद्यार्थी घडवले. याबरोबरच त्यांनी अंबाजोगाईची नाट्यचळवळ वृध्दींगत करण्याचे काम केले.

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
१९७३ मध्ये त्यांच्या पुढाकारानेच योगेश्वरी नाट्य मंडळाची स्थापना झाली. या मंडळामार्फत विविध नाटकं त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेत नेऊन अंबाजोगाईच्या नाट्य चळवळीला उभारी दिली. नामवंत लेखकांची नाटकं बसवून त्याचे दिग्दर्शन त्यांनी केले. शं. ना. नवरे यांचे ' सूर राहु दे', यासह  'बेईमान', 'ससा आणि कासव', 'नाती गोती' यासह जयकेतू या नाटकाचे दिग्दर्शन करून स्वत: जयकेतूची भुमीका त्यांनी केली.

ज्येष्ठ संगीतकार व कवी राम मुकदम (काका) यांच्या पुढाकाराने अंबाजोगाईत मेळे चालत असत, राष्ट्रसेवा दलाचे डॉ. व्दारकादास लोहिया व डॉ. शैला लोहिया यांच्या पुढाकाराने सामाज जागृतीवर आधारीत नाटकं व्हायची ही चळवळ आणि परंपरा पुढे वाढवण्याचे काम प्रा. केशव देशपांडे यांनी केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सूर राहु दे या नाटकात, नाट्य कलावंत डॉ. दिलीप घारे, प्रा. प्रकाश प्रयाग, प्रा.सुधीर वैद्य, विजया मुकदम यांनी त्यांच्यासोबत भुमीका केलेल्या होत्या. 

  त्यांच्या माध्यमातून योगेश्वरी महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातून अनेक कलावंत घडले. अंबाजोगाईच्या नाट्यचळवळीची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांच्या जाण्याने ही चळवळ आता पोरकी झाली आहे. अशा या ज्येष्ठ रंगकर्मीस भावपूर्ण श्रद्धांजली !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com