'काँग्रेसची अवस्था म्हणजे बर्मुडा पँटसारखी; एक अध्यक्ष आणि पाच कार्याध्यक्ष'

'काँग्रेसची अवस्था म्हणजे बर्मुडा पँटसारखी; एक अध्यक्ष आणि पाच कार्याध्यक्ष'

भोकरदन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांच्या खास ग्रामीण शैलीतील किस्से म्हणजे त्यांच्या समर्थकांसाठी पर्वणीच असते. नुकतीच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात व त्यांच्यासह पाच कार्यध्यक्षांची नेमणूक झाली. यावरून रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसला टोला लगावताना कॉंग्रेसची तुलना 'बर्मुडा पॅन्टशी' केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या सरपंच पदाच्या काळातील मजेशीर किस्सा सांगून उपस्थितांना पोट धरून हसायलाही भाग पाडले. 

भोकरदनमध्ये रविवारी रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. आपलेच लोक आणि गांव असल्यामुळे दानवे यांची गाडी बेफाम सुटली आणि त्यांनी कॉंग्रेसची तुलना थेट बर्मुडा पॅन्टशीच करून टाकली. बर, ही तुलना करतांना त्यांनी सांगितलेला किस्सा त्याहून अधिक गमतीशीर आहे. 

दानवे म्हणाले.....मी जेव्हा गावचा पहिल्यांदा सरपंच झालो, तेव्हा गावातील शाळेच्या हेडमास्तरने मला झेंडावंदनासाठी बोलावले. त्यासाठी पांढऱ्या रंगाचा ड्रेस लागेल असेही सांगितले. मग मीही मोठ्या हौशीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणला. मात्र मोठी पंचाईत झाली. पॅन्ट झाली मोठी अन मी झालो लहान.  मी माझ्या आईकडे गेलो आणि तिला पॅन्ट चार बोट लहान करून द्यायला सांगितलं. पण आई म्हणाली मला या वयात शिवणकाम सांगतो का? तुझं आता लग्न झालंय, तुझ्या बायकोला सांग. मग मी बायकोला म्हटलं पॅन्ट चार बोट कमी करून दे, तर बायको म्हणते माझ आत्ताच लग्न झालं आहे, मी नवखी घरातलं काम सोडून पॅन्ट छोटी कशी करून देऊ, मला नाही जमणांर.  शेवटी काकीकडे गेलो तर तीनेही मलाच सुनावंल. तुला काही वाटतं का? तुझ्या आईला सांगायचं नाहीतर तुझ्या बायकोला सांगायचं सोडून मला काम सांगतोस! झालं आमची पॅन्ट काही चार बोट लहान झालीच नाही......

.....पण खरी गंमत पुढेच आहे. आई, बायको आणि काकीन आधी मला नाही म्हटलं अन नंतर मात्र तिघींना माझी दया आली. आईला वाटलं माझा लेक पहिल्यांदा सरपंच झाला अन त्याच मी एवढंस काम करु शकले नाही. तिने हातात कात्री घेतली आणि पॅन्ट चार बोट कमी केली.  नंतर बायकोला पण पश्‍चाताप झाला तिने आणखी पॅन्ट चार बोट कमी करून ठेवली. मग नंबर होता काकीचा. तिला पॅन्ट दिसली तीनही चार बोट पॅन्ट कापून ठेवली. झेंडावंदनाच्या दिवशी मी पॅन्ट बघतो तर काय तिचा झाला बर्मुडा.....सध्या कॉंग्रेसचीही महाराष्ट्रात अशीच अवस्था झाली आहे.... एक प्रदेशाध्यक्ष आणि पाच कार्याध्यक्ष! दानवेंनी असे म्हणताच कार्यक्रमस्थळी एकच हस्यकल्लोळ उडाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com