Video : दानवे म्हणतात, जाचक अट रद्द करा, तीन महिन्यांचं धान्य एकदाच द्या

महेश गायकवाड
Saturday, 4 April 2020

गरिब पॅकेज योजनेत केंद्र सरकारने पंजाब व हरियाणा राज्यातून 16 रेल्वे रॅकद्वारे पन्नास हजार टन गहू व तांदूळ घेऊन महाराष्ट्रात पाठवल्या आहेत. त्यामुळे अन्नधान्यांची कमतरता नाही.

जालना : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात देशातील गरिब जनतेसाठी पुढील तीन महिने नियमित अन्न धान्याव्यतिरिक्त पाच किलो गहू व तांदूळ मोफत देण्याची घोषणा  केंद्र सरकारने केली आहे. मात्र, राज्य शासनाने सुरूवातीला नियमित धान्य वाटपानंतर मोफतचे अन्नधान्य वाटप करण्याची अट घातली आहे. 

ही जाचक अट रद्द करून एकाच वेळी तीन महिन्यांचे मोफत अन्नधान्य जनतेला वाटप करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.  शहरातील गरिब कुटुंबाना श्री. दानवे यांनी शनिवारी (ता.4) अन्नधान्याचे वाटप केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने ता.14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन केले आहे. या काळात गरिब जनतेचे हाल होऊ नये म्हणून एक लाख सत्तर हजार कोटीच गरिब पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून विविध घटकातील गरिबांसाठी अनेक योजनांची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

गरिब पॅकेजमधील अन्न योजनेत राज्यातील जनतेला नियमित मिळणाऱ्या पाच किलो रेशनव्यतिरिक्त दर महिन्याला पाच किलो गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे. राज्यातील शिधापत्रिका धारक कुटुंबाची संख्येनूसार राज्याला 22 लाख टन अन्नधान्याची गरज आहे. सध्या 12 लाख टन गहू व 8 लाख टन तांदूळ उपलब्ध आहे. 

गरिब पॅकेज योजनेत केंद्र सरकारने पंजाब व हरियाणा राज्यातून 16 रेल्वे रॅकद्वारे पन्नास हजार टन गहू व तांदूळ घेऊन महाराष्ट्रात पाठवल्या आहेत. त्यामुळे अन्नधान्यांची कमतरता नाही.

राज्य शासनाने अन्नधान्य वापतील जाचक अट रद्द करून  उपलब्ध अन्नधान्यांची उचल करून एकाच वेळी नियमित व मोफत अन्नधान्याचा पुरवठा जनतेला करावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raosaheb Danve Demand To Give Three Months Ration To Poor Maharashtra Jalna News Coronavirus