दानवेंच्या चौकशीची अमित शहांकडे मागणी 

भास्कर बालखंडे
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

जालना - जालना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अचानक माघार का घेतली? असा संतप्त सवाल करत जालना शहर शाखेचे माजी भाजप अध्यक्ष राजेंद्र बागडी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाच थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या माघारी मागे मोठे राजकारण झाले असून पक्षाची नाचक्की झाल्याचा आरोप करत दानवे यांची चौकशी करा अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासाठी बागडी यांनी तंबू टाकून थेट उपोषण सुरु केल्याने भाजपच्या तंबूत घबराट झाली आहे. 

जालना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून चमत्कारीकरित्या भाजपसह मित्रपक्ष शिवसेनेने देखील माघार घेतली. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असली तरी एकमेकांशी असलेले व्यावहारिक व राजकीय घनिष्ठ संबंध जोपासण्यासाठी विचारपूर्वक खेळण्यात आलेला हा राजकीय डाव असल्याचे आता उघड होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ असलेल्या जालन्यातच घेण्यात आलेली ही माघार भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. यातूनच माघारीच्या निर्णयाविरोधात भाजपच्या जालना शहर शाखेचे माजी अध्यक्ष राजेंद्र बागडी यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात सावरकर चौकात लाक्षणिक उपोषण सुरु करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली. 

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप शिवसेना यांच्यात युती होऊन अध्यक्षपदासह भाजपला 25 तर तर शिवसेनेला 36 जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने खासदार दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या पत्नी सुशीला दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. युती झाली असतांना शिवसेनेकडून शोभा अंबेकर यांनीही अर्ज भरला आणि तिथेच शंकेची पाल चुकचूकली. उमेदवारी मागे घेण्याच्या एकदिवस आधीच अगोदर सुशीला दानवे यांनी तर काही तासात शिवसेनेच्या शोभा अंबेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्यमंत्री खोतकर यांच्या सारखे दिग्गज नेते आणि जिल्ह्यात युतीचे चार आमदार असतांना माघार कशी घेतली असा प्रश्‍न जालनेकरांना पडला. अपक्ष उमेदवार शंकुतला कदम यांना युतीने पाठिंबा देऊन कॉंग्रेसच्या संगीता गोरंट्याल यांचा मार्ग मोकळा केल्याचे यावरुन स्पष्ट झाले. शिवसेना नेतृत्वाने हा प्रकार गांभीर्याने घेतला नसला तरी भाजपमध्ये मात्र यावरुन रणकंदन सुरु झाले आहे. 

जागा शिवसेनेकडे 

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी युती करताना नगराध्यक्षपद शिवसेनेला सोडण्यात आले होते. त्यामुळे एक दिवस अगोदर आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला. ही जागा शिवसेनेने लढविणे अपेक्षित होते. 

रावसाहेब दानवे, खासदार, जालना 

Web Title: Raosaheb Danve inquiry demand to amit shah