दानवेंच्या लग्नात राजवाड्याचे स्टेज; घोडागाडीतून वरात

दानवेंच्या लग्नात राजवाड्याचे स्टेज; घोडागाडीतून वरात

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र व भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांचा शाही विवाह (ता. 2) गुरुवारी सायंकाळी 7 वाजता औरंगाबादेत मोठ्या थाटात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्यातील मंत्री, सर्वपक्षीय आमदार, खासदार, संगीत क्षेत्रातील मान्यवर, सामजिक, राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती व जालना जिल्ह्यातील हजारो वऱ्हाडींची यावेळी उपस्थिती होती. 

आमदार संतोष दानवे यांचा विवाह औरंगाबादेतील प्रसिध्द गायक प्रा. राजेश सरकटे यांची कन्या रेणू हिच्या समेवत झाला. औरंगाबादच्या बीडबायपास परिसरातील जांबिदा इस्टेटच्या मैदानावर या विवाह सोहळ्यासाठी राजवाड्याची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली होती. गेल्या आठवड्यापासून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु होती. 

वरातीसाठी घोडागाडी; राजवाड्याचे स्टेज
दानवे यांच्या मुलाच्या विवाहाची व्यवस्था चोख असावी यासाठी लाखो रुपये खर्चून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे ही जबाबदारी सोपवला होता, अशी माहिती आहे. वऱ्हाडी व पाहुण्या मंडळींसाठी अनेक पदार्थांचा समावेश असलेली जेवणाची थाळी, वरातीसाठी खास मागवण्यात आलेली घोडा गाडी, राजवाडा वाटावा असे स्टेज आणि डेकोरेशन असा थाटमाट होता. विमानतळापासून विवाह स्थळापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात आले. दुपारपासूनच बीड बायपासकडे जाणाऱ्या इतर वाहतुकीवर पोलिसांनी नियंत्रण आणले. 

दिमाखदार सोहळा 
संतोष दानवे यांचा हा विवाह सोहळा दिमाखदार होता. विद्युत रोषणाई, फटाक्‍यांची आतषबाजी, खास घोडागाडीतून वधू-वरांची काढण्यात आलेली मिरवणूक व चाळीस हजारावर पाहुणे, वऱ्हाडी मंडळीसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. खासदार रावसाहेब दानवे यांच्या जालना तसेच आमदार संतोष दानवे यांच्या जाफ्राबाद-भोकरदन मतदारसंघातील हजारो नागरिक देखील या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. या विवाह सोहळ्याला केंद्र व राज्यातील चाळीसहून अधिक मंत्र्यांनी हजेरी लावल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अडीच लाख लोकांना निमंत्रण 
दानवे यांच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण मतदारसंघासह अडीच लाख लोकांना पाठविले होते, असे कळते. दहा प्रकारच्या पत्रिका त्यासाठी छापल्या होत्या. भोकरदन व जालना मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला या लग्नाचे आमंत्रण दिले होते. भोकरदन व दानवे यांचे मूळ गाव असलेल्या जवखेड्यात तीन दिवसांपासून विविध कार्यक्रम व जेवणावळी सुरू होत्या. 

पंचतारांकित हॉटेल बुक 
मुलाच्या लग्नासाठी निमंत्रित मंत्री व विविध पक्षाच्या नेत्यांची व्यवस्था शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी दोन दिवसापासून शहरातील प्रमुख हॉटेलमधील खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. या विवाह सोहळ्यासाठी काही मंत्री कालच शहरात दाखल झाले. 

कोट्यवधींचा खर्च 
दानवे यांच्या मुलाच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती या लग्नावर होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चामुळे. एकीकडे राज्यातील भाजप सरकार विवाह समारंभावर होणाऱ्या अनाठायी खर्चाला लगाम घालण्यासाठी लग्नामध्ये पाचशे पेक्षा अधिक वऱ्हाडींना बोलवू नका, जेवणाचा खर्च व नासाडी टाळण्यासाठी मर्यादित लोकांचे जेवण व मेन्यू मोजकाच असावा यासाठी कायदा करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे खासदार व प्रदेशाध्यक्षांनी मात्र मुलाच्या लग्नावर करोडो रुपये खर्च केले. 

युतीतील तणावामुळे शिवसेनेची पाठ 
मुंबई महापालिकेतील महापौरपदाच्या निवडीवरून शिवसेना-भाजप यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या मंत्री व नेत्यांनी दानवेंच्या घरच्या लग्नाकडे पाठ फिरवली. महापालिकेचे मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दानवे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर येथील शिवसेना आमदाराच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावणे पसंत केले.

मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती
वधू-वरास आर्शिवाद देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर, आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा, छत्रपती संभाजी राजे भोसले, वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकार, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, जलसंपदा व राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, वित्त व नियोजन, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, उद्योग व खणीकर्म राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराव, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, खासदार चंद्रकांत खैरे ,आमदार संदीपान भुमरे, संजय सिरसाट, माजी मुख्यमंत्री माजी राजेश टोपे, एकनाथ खडसे, भास्कर पाटील खतगावकर, बबनराव पाचपुते यांच्यासह राजकीय, समाजिक, औद्योगिक, सहकार व व्यापारी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विवाह सोहळ्याला प्रसिध्द गायिका उषा मंगेशकर, हदयनाथ मंगेशकर, साधना सरगम, अजित कडकडे, कार्तिकी गायकवाड यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com