कार्यकर्त्यांची भावना जाणूनच सत्तारांबाबत निर्णय - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

निवडणुकीत विरोधकांचीही मदत
माझ्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सहकारी व विरोधकांना मदतीचे आवाहन केले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत यासाठी विरोधकांतील (सत्तार यांनी काम केल्याचे नाव न घेता) काही लोक आले, त्यांनी मला मदत केल्याचे दानवे यांनी सांगितले. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते काही न बोलता विमानतळावरून निघून गेले.

औरंगाबाद - सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशावरून सिल्लोडसह जिल्ह्यात निष्ठावंतांची चलबिचल सुरू आहे. नाराज कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर सत्तार यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे नवनियुक्‍त केंद्रीय ग्राहक राज्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी (ता.४) ‘सकाळ’ला सांगितले. 

केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर श्री. दानवे पहिल्यांदा औरंगाबादेत आले. कार्यकर्त्यांनी चिकलठाणा विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत केले. भाजप प्रवेशाबाबत आमदार अब्दुल सत्तार मुंबईत ठाण मांडून होते. 

मंगळवारी सायंकाळी चार वाजता सत्तार आणि दानवे पुन्हा एकदा विमानात सोबत प्रवास करीत औरंगाबादेत आले. यापूर्वीही दानवे-सत्तार हे खासगी विमानाने मुंबईला गेले होते. सत्तार यांच्या प्रवेशाबाबत दानवे म्हणाले, की सिल्लोडच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर निर्णय घेणार आहे.

पुन्हा विमान प्रवास झाल्याविषयी विचारल्यानंतर श्री. दानवे म्हणाले, की सत्तार आणि माझी एक मिनीट भेट झाली. आता विखे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांचा मुहूर्त ठरल्यानंतर प्रवेश देऊ. मात्र, सत्तार यांच्याबाबत कोणताही मुहूर्त ठरला नसल्याचे त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raosaheb Danve Talking Politics