अपहरण करून विवाहितेवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

मैत्री असताना काढलेले फोटो परत मागण्यासाठी गेलेल्या नारेगाव येथील विवाहितेचे अपहरण करून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

औरंगाबाद - मैत्री असताना काढलेले फोटो परत मागण्यासाठी गेलेल्या नारेगाव येथील विवाहितेचे अपहरण करून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून संशयिताच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे, की शहरातील एका महाविद्यालयात फॅशन डिझायनरचे शिक्षण घेत असताना मैत्रिणीने जीम ट्रेनर अमोल संतोष थिटे यांच्यासोबत ओळख करून दिली. त्यानंतर विद्यापीठात अमोलसह पाच जणांचा ग्रुप फिरण्यासाठी गेला होता. यावेळी काही फोटो काढले होते. हे फोटो अमोल याच्याकडे होते. ते मागितले असता, आज देतो, उद्या देतो, असे सांगून अमोल याने टाळाटाळ केली. दरम्यान, मे 2018 मध्ये माझे लग्न झाल्यामुळे पुन्हा फोटो मागितले. आठ मार्चला अमोल याने कॅनॉट गार्डन येथे एका दुकानासमोर बोलविले. अमोल व त्याचा मित्र अफसर शहा तिथे उभे होते. तुझे फोटो कारमध्ये आहेत, असे सांगून त्यांनी मला कारपर्यंत नेले. कारमध्ये एक जण बसलेला होता. अमोल याने कारमध्ये बळजबरीने बसवून वाशीम येथे नेले व एक महिना एका रूममध्ये डांबून ठेवून बलात्कार केला. नऊ एप्रिलला चुलतमामा अमोलसोबत आला व त्याने मला हिंगोली येथे आणले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यावरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rape on married woman in aurangabad