अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

  • वाळूज परिसरातील घटना 
  • संशयित स्वतः पोलिस ठाण्यात हजर
  • वाळूज पोलिसांनी केली अटक
  • दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 

औरंगाबाद - एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एकवीसवर्षीय युवकाला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली. ऋतिक वाघमारे (रा. वडगाव कोल्हाटी) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

पीडित मुलीच्या पालकांनी 21 नोव्हेंबरला मुलीला दुपारी शाळेत सोडले होते. सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर तिला आणण्यासाठी तिची आई गेली असता शाळा सुटून बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्यामुळे शाळेत जाऊन तिचा शोध घेतला; पण ती सापडली नाही. त्यामुळे याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेऊन हरवल्याची तक्रार
दिली. दरम्यान, बुधवारी (ता.27) तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणारा वडगाव कोल्हाटी येथील ऋतिक वाघमारे हा पोलिस ठाण्यात दक्षता पथकासमोर हजर झाला. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी दिली.

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

या तक्रारीवरून ऋतिक विरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ऋतिकला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला प्रभारी विशेष न्यायाधीश डॉ. एम. एस. देशपांडे यांनी दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडिया यांनी युक्तिवाद केला. 

अयोध्यानगरीतून दुचाकीची चोरी 

औरंगाबाद : मोहन गंगाधर वाघ (रा. टाकळी, ता. पैठण) यांची दुचाकी वॉकिंग प्लाझा गार्डन, अयोध्यानगरी येथून चोरी झाली. ही घटना रविवारी (ता. 24) घडली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार छावणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.  

अवैधपणे दारू बाळगणारा ताब्यात 

औरंगाबाद : अवैधपणे दारू बाळगल्याप्रकरणी नरेंद्र बाबूलाल खौसी (वय 22, रा. मुकुंदवाडी) याला गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सतरा देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई 26 नोव्हेंबरला संजयनगर, मुकुंदवाडी भागात घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 

क्लिक तर करा - कसा असावा प्रकृतीनुरूप आहार 

पर्यटक मुलगा बेपत्ता 

औरंगाबाद : नातेवाइकांसोबत पश्‍चिम बंगालहून पर्यटनासाठी आलेला मुलगा बेपत्ता झाला. ही घटना 25 नोव्हेंबरला मोमीनपुरा, लोटाकारंजा येथे घडली. याबाबत शेख मोंटू अली साजानशेख (रा. मोमीनपुरा, औरंगाबाद) यांनी तक्रार दिली. ते सोने-चांदीचे दागिने बनवतात. त्यांची बहीण, भाऊ व भाचा कोलकात्यावरून शहरात फिरण्यासाठी आले होते. बहीण व
भाऊ गावी परत गेले; पण त्यांचा भाचा शेख फिरदोस अली शेख महंमद अली (वय 16, रा. जि. वर्धमान, पश्‍चिम बंगाल) हा शेख मोंटू यांच्याकडेच थांबला होता. 25 नोव्हेंबरला रात्री तो मावसभावासाठी नाष्टा घेऊन येतो असे सांगून घरातून गेला. त्यानंतर मात्र तो परतला नाही. त्याचा शोध त्याच्या मूळ गावी व औरंगाबादेत घेतला तरीही तो न सापडल्याने याबाबत शेख मोंटू यांनी तक्रार दिली. सिटी चौक पोलिस ठाण्यात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा - खुशखबर इथे आहेत नोकरीच्या एक लाख संधी

 

बुलेटची चोरी, गुन्हा दाखल 

औरंगाबाद : रविकांत सूर्यचंद्र दुबे (रा. काळा गणपती मंदिराजवळ, एन-1, सिडको) यांची बुलेट चोराने लंपास केली. ही घटना बुधवारी (ता. 27) दुपारी दोन ते चार या वेळेत घडली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raping 14-Year-Old Girl in At Waluj Aurangabad