परभणी जिल्ह्यात आढळला हा दुर्मिळ पक्षी

‘हळद्या’ पक्षी
‘हळद्या’ पक्षी

जिंतूर : (जि.परभणी) जिंतूर तालुक्याच्या जैवविविधतेत भर घालणारा, स्थानिक निवासी परंतु, क्वचितच नजरेस पडणारा  ‘हळद्या’ नावाचा पक्षी मागील तीन चार दिवसांपासून चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील झाडावर बसलेला वन्यजीव छायाचित्रकार विजय ढाकणे यांनी आढळून आला आहे. भारतीय उपखंडासह मध्य आशिया खंडात याचे वास्तव्य असते.

 जिंतूर शहरात पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पक्षी छायाचित्र प्रदर्शन  भरवण्यात आले होते.  या सप्ताहाच्या निमित्तानेच सध्या पक्षीमित्रांचे पक्षी निरीक्षण सुरू आहे. चारठाणा (ता.जिंतूर) प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी तथा हौशी वन्यजीव छायाचित्रकार विजय ढाकणे यांना पक्षी निरीक्षणा दरम्यान, ‘हळद्या’ नावाचा पक्षी आढळून आला. हळद्या हा तसा स्थानिक रहिवासी पक्षी असला तरी तो क्वचितच नजरेस पडतो. याचे शास्त्रीय नाव ‘ओरिओलस’ असे असून इंग्रजीत इंडियन गोल्डन ओरिओल किंवा युरेशियन गोल्डन ओरिओल म्हणतात. तर मराठीत हळद्या, आम्रपक्षी, हळदुल्या, अंबेरा किंवा आदिवासी भागात हळदोई म्हणूनही ओळखल्या जातो. 

शरीराचा भाग हळदी सारखा
मैनेच्या आकाराचा हा पक्षी आकाराने साधारणतः २५ सेमी एवढा असतो. याच्या शरीराचा मोठा भाग हा हळदी सारखा पिवळसर असून पंख आणि शेपटीच्या वरचा काही भाग काळसर असतो. पाय राखाडी रंगाचे असून चोंच फिकट गुलाबी रंगाची असते. डोळ्या भोवती काळसर रंगाच्या दिसणाऱ्या कडा या पक्षाच्या सौंदर्यात भर घालतात. याचा विणीचा काळ एप्रिल ते जुलै असा असतो. याचे मुख्य खाद्य झाडाची फळ किंवा छोटे कीटक असते.

आशिया खंडात वास्तव्य
 भारतीय उपखंडासह मध्य आशिया खंडात याचे वास्तव्य आढळून येते. त्याचबरोबर पाकिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, नेपाळसह भारतात सर्वत्र हा आपल्या पिलांना जन्माला घालतो. असा हा हळद्या पक्षी चारठाणा परिसरात आढळल्याने पक्षीप्रेमी सुखावले असल्याची माहिती विजय ढाकणे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली.

पक्षांच्या अधिवासाचे संवर्धन होणे गरजेचे 
जिंतूर तालुक्यात कवडा, रायखेडा, निवळी, मैनापुरी, येनोली यासारख्या मोठ्या पाझर तलावासह अनेक छोट्या छोट्या तलावामध्ये हिवाळ्याच्या या दिवसात परदेशी पाहुण्यांसह स्थानिक पक्ष्यांचे सुद्धा नैसर्गिक अधिवास आहेत. यापैकी कवडा आणि निवळी हे तलाव पक्षांच्या अधिवासासाठी योग्य असून विविध प्रकारची जैवविविधता या ठिकाणी बघावयास मिळते. पक्षी सप्ताहानिमित्त कवडा, येनोली, या ठिकाणी पक्षीमित्रांनी निरीक्षण केले असता २१ विविध प्रजातींचे पक्षी आढळून आले. जिंतूर शहरापासून जवळच असलेल्या मैनापुरी येथील तलाव परिसरात मोरांचे वास्तव्य मोठ्याप्रमाणात होते. परंतु, मानवाचा त्याठिकाणी वाढता वावर, मोरांची शिकार तसेच प्रशासनानेच रस्त्याच्या कामासाठी केलेले खोदकाम यामुळे या ठिकाणचे मोरांचे वास्तव्य कमी झाले असून मोर नाहीसे होत आहेत. अशा अधिवासांचे संवर्धन होण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करणे गरजेचे आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com