आंबेडकर भवन प्रकरणावरून रत्नाकर गायकवाड यांना मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

औरंगाबाद - राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज बेदम मारहाण केली. त्या वेळी त्यांच्या पत्नीही तेथे होत्या, त्यांनाही धक्काबुक्की झाली. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृह येथे घडली. 

औरंगाबाद - राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज बेदम मारहाण केली. त्या वेळी त्यांच्या पत्नीही तेथे होत्या, त्यांनाही धक्काबुक्की झाली. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृह येथे घडली. 

सहायक पोलिस आयुक्त रविकांत बुवा यांनी सांगितले की, गायकवाड पत्नीसह औरंगाबादेत आले होते. सोमवारी सकाळी अकराला विभागीय माहिती कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यानंतर गायकवाड व त्यांच्या पत्नी दुपारी सुभेदारी विश्रामगृहात थांबले होते. ही बाब भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांना समजली. त्यांच्यासह श्रीरंग ससाणे, दिनेश साळवे, श्‍वेता धुळे, रेखा उदगरे, गौतम गवळी, संदीप वाघमारे, प्रदीप इंगळे आदी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दुपारी तीनच्या सुमारास सुभेदारी विश्रामगृह गाठले. त्यानंतर भुईगळ व अन्य कार्यकर्त्यांनी गायकवाड थांबलेल्या खोलीत शिरून त्यांना मारहाण सुरू केली. 

याघटनेमुळे एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या प्रकारानंतर गायकवाड व त्यांच्या पत्नीने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी भुईगळ यांनी त्यांची अडवणूक करून पकडले. एका हातात मोबाईल असल्याने गायकवाड यांना फारसा प्रतिकार करता आला नाही, असेही बुवा यांनी सांगितले. 

कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना आंबेडकर भवन पाडल्याच्या कारणावरून जाब विचारणे सुरू केले. विश्रामगृहाच्या आवारात आल्यानंतर गायकवाड खाली कोसळले असता, त्यांना पुन्हा मारहाण सुरू झाली. या वेळी बेगमपुरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाच ते सात जणांच्या ताब्यातून गायकवाड यांची सुटका केली व त्यांना सुरक्षितस्थळी हलविले. या घटनेनंतर अमित भुईगळ व त्यांच्या साथीदारांना बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेत ठाण्यात नेले. त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा; तसेच गुन्हेगारी कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. यात आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. 

काय आहे प्रकरण? 
दादर येथील आंबेडकर भवन 25 जूनला पाडण्यात आले. त्यानंतर आंबेडकर अनुयायींनी आंबेडकर भवन पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांचा जाहीर निषेध केला होता. तेथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक प्रिंटिंग प्रेसही होती. ही ऐतिहासिक वास्तू पाडण्यात आल्याची चीड पदाधिकारी, कार्यकर्त्यांत होती. त्यावरूनच गायकवाड यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

रत्नाकर गायकवाड यांची विमानतळावर मी विचारपूस केली असून, तेथेच त्यांची फिर्याद घेण्यात आली. या प्रकरणात आठ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त 

Web Title: Ratnakar Gaikwad beat