ऑनलाईन कंपनीत नोकरीसाठी पैसे मागितल्यानंतर छापा

औरंगाबाद - ऑनलाईन कंपनीसाठी निवड करण्याच्या निमित्ताने मुलाखतीवेळी पैसे मागितल्याप्रकरणानंतर बुधवारी पोलिस आयुक्तालयात दिसून आलेली गर्दी.
औरंगाबाद - ऑनलाईन कंपनीसाठी निवड करण्याच्या निमित्ताने मुलाखतीवेळी पैसे मागितल्याप्रकरणानंतर बुधवारी पोलिस आयुक्तालयात दिसून आलेली गर्दी.

सायबर सेलकडून दोघांना अटक, उमेदवारांच्या सुरू होत्या मुलाखती

औरंगाबाद - ऑनलाईन क्षेत्रात नावाजलेल्या कंपनीमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली मुलाखतीनंतर अर्ध्या पगाराची मागणी केल्याच्या तक्रारीवरून दोन संशयितांना सायबर सेलने बुधवारी (ता. २१) अटक केली. बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये ते उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना पोलिसांनी छापा टाकला. 

अभिजित हरीदास दहिवाळकर (रा. भोसरी, आळंदी, पुणे) व राजू गंगाराम बोरगावकर (रा. पौर्णिमानगर, नांदेड) अशी दोन संशयितांची नावे आहेत. त्यांना कागदपत्रांसह अटक झाली. 

काही दिवसांपूर्वी जॉबसाठी दहावी, बारावी, पदवीधर मुले पाहिजेत अशी जाहिरात आली होती. या जाहिरातीमध्ये संपर्क साधण्यासाठी मोबाइल क्रमांक देण्यात आला होता. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर बेरोजगारांना बुधवारी (ता. २१) मुलाखतीसाठी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील हॉटेल मोदी सम्राटमध्ये बोलावण्यात आले. त्यातील काही बेरोजगारांना कन्सल्टंसी सर्व्हिसेसद्वारे बोलावण्यात आले होते.

मुलाखतीनंतर नोकरी लागल्यावर अर्ध्या पगाराची मागणी त्यांनी बेरोजगारांना केली. नोकरीपोटी पैसे मागण्याच्या प्रकारामुळे त्यांतील काहींनी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर सायबरसेलचे सहायक निरीक्षक उन्मेष थिटे यांनी पथकासह तेथे छापा घातला. तेथे बेरोजगारांची मुलाखत घेणाऱ्या दहिवाळकर व बोरगावकर यांना ताब्यात घे,क्‍किसून चौकशी केली. याप्रकरणी मोहसीन शेख सिकंदर शेख (रा. पुष्पक गार्डन, चिकलठाणा) या तरुणाच्या तक्रारीनुसार, क्रांती चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेष थिटे, उपनिरीक्षक नितीन आंधळे यांच्यासह पथकाने केली. दहिवाळकर व बोरगावकर यांनी उमेदवारांना बोलावून त्यांच्याकडून शंभर रुपये घेऊन फॉर्म भरून घेतले. त्यानंतर उमेदवारांची मूळ कागदपत्रे स्वतःकडे ठेवली होती. सायबर सेलने ही कागदपत्रे जप्त करून उमेदवारांना दिली.
 

उपकंत्राटावर उपकंत्राट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ कंपनीने मुंबई येथील एका कन्सल्टंसीला उमेदवार भरतीचे काम सोपवले होते. या कन्सल्टंसीने पुणे येथील कंपनीला उपकंत्राट दिले. पुण्याच्या कंपनीने नांदेड येथील अनुप्रीत सर्व्हिसेस या कंपनीला हे काम सोपवले. अनुप्रीत सर्व्हिसेसतर्फे बेरोजगार मुलाखतदात्यांच्या मुलाखती सुरू असताना ही पैशांची मागणी झाली अशी माहिती अटकेतील दोघांच्या चौकशीतून समोर आली; मात्र याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com