रेडिमेडची समाजमनावर अशीही मोहिनी : कशी ते वाचा

प्रमोद चौधरी
गुरुवार, 16 जानेवारी 2020

रेडीमेड हा कधीकाळी अवचित बोलला जाणारा शब्द आता सर्वतोमुखी झाला आहे. साधारणतः कापड विकत घेऊन शिंप्याकडून वस्त्र शिवून घेणे असा प्रघात १९८० पूर्वी सर्वत्र होता. परंतु, अता ग्राहक तयार कपडे खरेदी करण्यास प्रवृत्त झाला.

नांदेड :  काळाच्या बदलासोबतच रेडीमेड सुविधांनी समाजमनावर मोहिनी निर्माण केली आहे. विवाह सोहळा हा घरात, घरासमोर फारतर गावातील देवळात संपन्न होण्याची प्रथा होती. पुढे चालून विवाह सोहळ्याकरिता रेडिमेड कार्यालये बांधली जाऊ लागली आणि समाजमनात ही व्यवस्था भावली. आज कार्यालय घेऊनच विवाह सोहळा संपन्न केला जात आहे. पूर्वी विवाह सोहळ्यात स्वयंपाक करणे हा विषय सोपा नव्हता. वधू पक्षाकडील बहुतेक नातलग स्वयंपाक करण्यात व्यस्त असत. सर्व सामान विकत आणून आचाऱ्याच्या मार्फत स्वयंपाक केला जात असत. वऱ्हाडीदेखील लग्नकार्यात स्वतःला झोकून देत असत.

रेडिमेड घरांनाच प्राधान्य

No photo description available.
संग्रहित छायाचित्र

काळाच्या ओघात विचारसरणीत मोठ्या प्रमाणावर बदल झाला. लग्नसोहळ्यात मिळवणारे वाढले आणि काम करणारे कमी झालेत. यातूनच रेडीमेड फुड म्हणजे अन्न तयार करणारे कॅटरर उदयास आले. पैसे मोजून पाहिजे ती सेवा प्राप्त करता येते, या विचाराने पक्के मूळ धरले. घर बांधायचे झाल्यास विटा, रेती, सिमेंट इत्यादी आणून घर बांधणे ही प्रथाही मोडकळीस आली आहे. बिल्डर नावाची चलती सुरु झाली. घर बांधण्यासाठी जे श्रम असतात त्याबदल्यात अधिक रक्कम मोजली की तयार घराचा ताबा अगदी पाहिजे त्यावेळी मिळू लागला. आज गृहनिर्माण क्षेत्राचा विचार केल्यास निवासी घरांचे सर्वाधिक बांधकाम बिल्डर मंडळी करीत आहेत.  

असा झाला बदल
१९९०च्या दशकात भारतीयांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्यास प्रारंभ झाला. उत्पन्न वाढले; पण त्याची बचत न करता त्या उत्पन्नाचा विनियोग मौजमजे करिता करायचा, या विचारांचा पगडा तरुण पिढीवर घट्ट बसला. या विचारातूनच अनेक नवनवीन प्रयोग सुरु झाले. फुले आणून त्याचा हार करण्याची पद्धत मागे पडली व त्याऐवजी रेडीमेड हार खरेदी केला जाऊ लागला.

शाळेचे गणवशही रेडिमेड                                                                शाळकरी मुलांचे गणवेश कापड आणून शिवायचे असतात हा विषयच हल्ली बंद झाला आहे. शाळेचा रेडिमेड गणवेश दुकानातून निमूटपणे खरेदी करणे अशी प्रथा सुरु झाली. कमावत्या महिलांची संख्या वाढली तसे पोळी करण्यात अधिक वेळ लागतो, असे संशोधन समोर आले आणि मान्यही झाले. पोळी करण्यासाठी पोळीवाली लावणे, दुध वा वर्तमानपत्र जसे घरपोच येते त्या धर्तीवर रोजचा पोळ्यांचा रतीब लावणे, असेही प्रकार सुरु झालेत. 

No photo description available.
रेडिमेड कपड्यांचे संग्रहित छायाचित्र

पाश्‍चात्य विचारसरणीचा प्रभाव 
रेडीमेडच्या आहारी किती जायचे हा मुद्दा विचारवंतांची चिंता वाढविणारा आहे. खा, प्या आणि मौज करा ही पाश्चात्य विचारसरणी सुख निर्माण करू शकत नाही. भारतीय विचारसरणी उपभोगावर नियंत्रण ठेवण्यास शिकविते. शरीराला झीज लागू द्यायची नाही, पैसे फेकून पाहिजे ते घ्यायचे, हा विचार एका मर्यादेपलिकडे गेला तर रेडिमेड दुःख वाट्याला येणार, यात शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Readymade also has a fascination with society: how to read it