टाऊन हॉलच्या पुलाखालील तळ्याचे रहस्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : टाऊन हॉलच्या उड्डाणपुलाखाली कित्येक वर्षांपासून पाणी तुंबते. पावसाळ्यात हे प्रमाण एवढे वाढते, की हा पूर्ण रस्ताच पाण्याखाली असतो. पण या साचणाऱ्या तळ्याचे रहस्य काय, हे कित्येक नागरिकांना माहितीच नाही. 

औरंगाबाद : टाऊन हॉलच्या उड्डाणपुलाखाली कित्येक वर्षांपासून पाणी तुंबते. पावसाळ्यात हे प्रमाण एवढे वाढते, की हा पूर्ण रस्ताच पाण्याखाली असतो. पण या साचणाऱ्या तळ्याचे रहस्य काय, हे कित्येक नागरिकांना माहितीच नाही. 

टाऊन हॉलपासून तीन किलोमिटर अंतरावर एक ऐतिहासिक तलाव आहे. सध्या सलीम अली सरोवर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तळ्यातून तीनशे वर्षांपूर्वी नहरीने पाणी शहरात आणले गेले होते. पुढच्या काळात जागोजाग अतिक्रमणांनी फोडल्या. त्यामुळे हे पाणी आमखास मैदानावरील कमल तलावात येऊ लागले. 

हा कमल तलाव शहराच्या महापालिकेच्या "कर्तृत्त्ववान' अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बुजवला गेला. तळ्याच्या जागेवर अतिक्रमणे झाली. 2017 मध्ये कचराकोंडीच्या काळात महापालिकेने कचऱ्याचे ट्रक ओतून उरलासुरला तलावही बुजवला. त्यामुळे सलीम अली सरोवरातून येणारे पाणी साठणार तरी कसे? 

या पाण्याचे पाझर उचंबळून रस्त्यावर येतात आणि टाऊन हॉल परिसराला पाण्याचा विळखा पडतो. याच पाण्यामुळे ड्रेनेजलाईनही तुंबते आणि ड्रेनेजचे पाणी त्यात मिसळून सर्वत्र दुर्गंधी पसरते. काही गल्ल्यांमध्ये पाणी शिरते आणि नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड होऊन बसते. महापालिका यावर काहीच निश्‍चित उपाययोजना करत नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

पुलाखाली मासेमारी...! 

उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात यंदाच्या पावसाळ्यात मासेही वर येऊ लागले आहेत. त्यामुळे रस्त्यावर साचणाऱ्या तळ्यात हे मासे पकडण्यासाठी परिसरातील मुले एकच गर्दी करतात आणि वाहनचालकांची कोंडी होऊन बसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reason behind town hall blockage