तुळजाभवानी मंदिरात सिंहासन पूजेसाठी तीनशे भाविकांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

तुळजाभवानी मंदिरात सिंहासन पूजेकरिता सोमवारपासून (ता. 12) नोंदणी सुरू करण्यात आली. पहाटेपासूनच रांगा लावून दिवसभरात सुमारे तीनशे भाविकांनी नोंदणी केली. दरम्यान, काही तक्रारी प्राप्त झाल्याने नोंदणी तूर्तास बंद करण्यात आली आहे. 

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मंदिरात सिंहासन पूजेकरिता सोमवारपासून (ता. 12) नोंदणी सुरू करण्यात आली. पहाटेपासूनच रांगा लावून दिवसभरात सुमारे तीनशे भाविकांनी नोंदणी केली. दरम्यान, काही तक्रारी प्राप्त झाल्याने नोंदणी तूर्तास बंद करण्यात आली आहे. 

तुळजाभवानी मंदिरात जानेवारी 2020 पासूनच्या सिंहासन पूजेसाठी आज नोंदणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार सिंहासन पूजेकरिता नोंदणी केलेल्या भाविकांचा आकडा सुमारे तीनशेपर्यंत गेला आहे.

एका सिंहासन पूजेसाठी अकराशे रुपये शुल्क मंदिर समितीकडे भरावे लागते. तसेच, संबधिताचे आधारकार्डही द्यावे लागते. तुळजाभवानी मंदिर समितीने मागील सहा महिन्यांपासून नोंदणी बंद केली होती. त्यानंतर आज नोंदणी करण्यात आली. दह्याच्या सिंहासन पूजेसाठी 551 रुपये शुल्क असते. तथापि श्रीखंडाचे सिंहासन करण्यास भाविकांचा मोठा ओघ असतो.

 
तुळजाभवानी मातेची सिंहासन पूजा ही सर्वात मोठी पूजा समजण्यात येते. सुमारे 65 लिटर श्रीखंड, दही, लोणी, आमरस (आंब्याचा रस) आदी पदार्थांचे तुळजाभवानी मातेच्या सिंहासनात अर्पण केले जातात. एका दिवशी सकाळी पाच, तर सायंकाळी दोन अशा सिंहासन पूजा सध्या मंदिरात केल्या जातात. 

तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेसाठी सोमवारी नोंदणी सुरू केली होती. नोंदणीचा निश्‍चित आकडा नाही. तुळजाभवानी मंदिर समितीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्‍यक वस्तू पाठविण्याचे कामकाजही सोमवारी सुरू केले आहे. त्यामुळे मंदिराची सर्व कार्यालयीन कामाकाजाची यंत्रणा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुंतलेली आहे. सिंहासन नोंदणीमध्ये काही तक्रारी प्राप्त झाल्याने तूर्तास नोंदणी बंद करण्यात आली. चार-पाच दिवसांनंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर नोंदणीचा निर्णय घेतला जाईल. 
- सिद्धेश्वर इंतुले, धार्मिक व्यवस्थापक, तुळजाभवानी मंदिर समिती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Registration of three hundred devotees for the throne worship at Tulja Bhavani Temple