कोपर्डी खटला स्थलांतरित करण्याची याचिका फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

औरंगाबाद - कोपर्डी (जि. नगर) अत्याचार प्रकरणाचा खटला स्थलांतरित करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर यांनी फेटाळून लावली.

औरंगाबाद - कोपर्डी (जि. नगर) अत्याचार प्रकरणाचा खटला स्थलांतरित करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर यांनी फेटाळून लावली.

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे 13 जुलै रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी कर्जत पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी नितीन भैलुमे याने नगर विशेष न्यायालयातील खटला अन्य न्यायालयात वर्ग करण्यासाठी विनंती याचिका दाखल केली होती. सध्या गावामध्ये जातीय तणावाचे वातावरण असल्याने जीविताला धोका असल्याचे कारण देऊन हा खटला अन्य न्यायालयात वर्ग करण्याची विनंती याचिकेत होती.

सरकारतर्फे ऍड. अमरजितसिंह गिरासे यांनी खटला वर्ग करण्याला विरोध केला. या खटल्यात न्यायालयात आतापर्यंत चार साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत, खटला जलद गतीने सुरू आहे. याचिकाकर्त्याने दिलेल्या बाबी गृहीतकांच्या आधारावर नाहीत, त्या निराधार आहेत. केवळ मर्जीखातर हा खटला स्थलांतरित होऊ शकत नाही, त्यामुळे याचिका फेटाळावी, अशी विनंती त्यांनी केली. सुनावणीनंतर खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, कोपर्डी प्रकरणात आपल्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा नसल्याने गुन्ह्यातून वगळण्यात यावे, असा नितीन भैलुमे याचा अर्ज यापूर्वीच अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्याने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र, खंडपीठातही त्याची ही याचिका फेटाळल्याने त्याने माघार घेतली होती.

Web Title: Rejects petition to migrate kopardi case