बीड जिल्ह्याला दिलासा; ७४ निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

धारूर तालुक्यातील आंबेवडगावात एकाच कुटुंबातील तिघे बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील २० जणांच्या अहवालाकडे लक्ष लागले होते, ते सर्व निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

बीड - जिल्ह्याला रविवारी (ता. सात) मोठा दिलासा मिळाला. तपासणीला गेलेल्या ७५ पैकी तब्बल ७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. धारूर तालुक्यातील आंबेवडगावात एकाच कुटुंबातील तिघे बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील २० जणांच्या अहवालाकडे लक्ष लागले होते, ते सर्व निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यातून रविवारी एकूण ७५ जणांचे स्वॅब तपासणीला गेले होते.

जिल्हा रुग्णालय ६, सीसीसी बीड ९, अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातून ६, सीसीसी अंबाजोगाई २५, केज उपजिल्हा रुग्णालय २०, आष्टी ग्रामीण रुग्णालयातून २ व परळी उपजिल्हा रुग्णालयातील ८ जणांच्या स्वॅबचा समावेश होता. ७५ पैकी ७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून शहरातील झमझम कॉलनीतील ६१ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला हैदराबाद येथील प्रवासाची पार्श्वभूमी आहे. रविवारी कोरोना रुग्णसंख्येत एकने वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या एकूण रुग्णांचा आकडा ७० झाला आहे. दरम्यान, रविवारी आणखी चौघे कोरोनामुक्त झाले असून आता एकूण ११ जणांवर जिल्हा रुग्णालयात तर परळीच्या महिलेवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, रविवारी चौघे कोरोनामुक्त झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief to Beed district; 74 Negative, one positive