धर्म नाकारणे म्हणजे धर्मनिरपेक्षता नव्हे! - उत्तम कांबळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

लातूर - धर्म नाकारणे म्हणजे धर्मनिरपेक्षता नव्हे किंवा नास्तिक होणे म्हणजेदेखील धर्मनिरपेक्ष होणे असे नाही. तर आपल्या व दुसऱ्याच्या धर्माकडे सम्यक दृष्टीने पाहणे म्हणजेच खरी धर्मनिरपेक्षता होय, असे मत ज्येष्ठ पत्रकार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी येथे व्यक्त केले.

लातूर - धर्म नाकारणे म्हणजे धर्मनिरपेक्षता नव्हे किंवा नास्तिक होणे म्हणजेदेखील धर्मनिरपेक्ष होणे असे नाही. तर आपल्या व दुसऱ्याच्या धर्माकडे सम्यक दृष्टीने पाहणे म्हणजेच खरी धर्मनिरपेक्षता होय, असे मत ज्येष्ठ पत्रकार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी येथे व्यक्त केले.

येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात मंगळवारी (ता. सात) मूल्यशिक्षणांतर्गत "धर्मनिरेपक्षता' या विषयावर श्री. कांबळे यांचे व्याख्यान झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. डी. साळुंके, उपप्राचार्य महादेव गव्हाणे, माधव बावगे, अनुजा जाधव उपस्थित होत्या.

धर्म, देव नावाची गोष्ट माणसानेच जन्माला घातली आहे. माणूस हा अस्थिर, चंचल आहे. तो फक्त मृत्यूला घाबरतो. मृत्यू चुकविण्यासाठी त्याने वेगवेगळ्या कल्पना जन्माला घातल्या. यातीलच एक धर्म, देव ही आहे. माणसावर नियंत्रण, सुंदर जगण्यासाठी धर्म हस्तक्षेप करतो; पण धर्मानेच आपल्याला जन्माला घातले असा समज निर्माण केला गेला. धर्मातून पुढे जात ही व्यवस्था जन्माला आली. हृदय बदलता येईल; पण जात नाही, अशी व्यवस्था पुढे आली. धर्मापेक्षा माणूस समजून घेतला तर धर्मनिरपेक्षता कळेल. धर्म समजून घेण्यासाठी माणसाला आणि माणूस समजून घेण्यासाठी स्वतःला समजून घेण्याची गरज आहे, असेही श्री. कांबळे यांनी नमूद केले.

न्यायालयात एखाद्या धर्मग्रंथावर हात ठेवण्याऐवजी राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घ्यायला लावली जाईल, त्यावेळेसच खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता आली असे म्हणता येईल. मानवी जीवनाला आकार देणाऱ्या धर्माकडे निकोप, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. धर्माने विज्ञानाचे फायदे घेतले; पण विज्ञानाचा आदर केला नाही. धर्म व संस्कृतीवरून संघर्ष होतील यात माणसाच्या बाजूने की धर्माच्या बाजूने उभे राहणार, याचा विचार करण्याची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टीचा विकास हा चिकित्सेतून होतो. चिकित्सा ही प्रश्नातून तयार होते. धर्माची चिकित्सा झाली पाहिजे, असेही श्री. कांबळे यांनी नमूद केले. या वेळी श्री. साळुंके यांचेही भाषण झाले.

Web Title: Religion is not secularism refuse!