घाटी रुग्णालयात नोंदणी शुल्क सवलत हटवल्याने रोज दहा हजाराची कमाई

योगेश पायघन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

नव्याने आलेले शासन एक रुपयात तपासणी अन्‌ दहा रुपयात जेवन देण्याचा मानस व्यक्त करत असतांना त्याविरोधात आताच का हा निर्णय घेतला. या बद्दल विविध तर्कवितर्क लढवल्या जात आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांत एकाही राजकीय पक्षाने आक्षेप नोंदवला नाही हे विशेष. 

औरंगाबाद : घाटीतील ज्येष्ठ नागरीक, बेवारस, कैदी रुग्ण अशी चौदा प्रकारातील रुग्णांना नोंदणी शुल्कात वीस रुपयांची मिळणारी सवलत हटवल्याने दररोज दहा हजार रुपयांचा महसूल प्रशासनाला अधिकचा मिळायला सुरुवात झाली. सवलत हटवली असली तरी गरजूंना मदतीची भुमिका राहील याची काळजी घेवू असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कैलास झिने म्हणाले. 

घाटीत सोमवार, मंगळवार, बुधवार 2200 ते 2600 जणांची नोंदणी होते. तर गुरुवार शुक्रवार शनिवारी 1800 पर्यंत रुग्णांची नोंदणी होते. त्यातील हजार ते बाराशे रुग्णच 20 रुपये नोंदणी शुल्क भरतात.

हेही वाचा ः यापुढे बिबटे येतच राहणार 

दरम्यान, वर्षभरात एचएमआयएस नोंदणीतील प्रक्रीयेतील अनेक सुविधांचा लाभ घेतला जात नसल्याने एक क्लिकवर रुग्णालयाच्या सर्व कारभाराची माहीती मिळण्याच्या उद्देशाला हारताळ फासला गेलेला आहे. वार्डांतून निम्यांहून अधिक नोंदणी होत नाही. तर जन्म, मृत्यूच्या नोंदींसाठी नातेवाईकांना सहा सहा महिने खेट्या माराव्या लागत आहे. एचएमआयएस प्रणालीचा पुर्ण वापर करण्यात अयशस्वी ठरलेल्या तर प्रशासनातील "तज्ज्ञ' सहकाऱ्यांनी जीआरवर बोट ठेवून हा निर्णय लागू करण्याचा घाट घातल्याचे अनेकांना रुचलेले नाही. घाटीत कोणत्या आजाराचे किती रुग्ण, किती ऑपरेशन झाले हि माहीती अद्यापही एचएमआयएसमधून मिळू शकत नाही. 

आत्ताच अन्‌ अंधारात का?

राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सवलत दिली जात नाही. म्हणून इथेलागू केल्याचे घाटी प्रशासन सांगत आहे. मग, गेल्या दोन वर्षात हा नियम का लागू केला गेला नाही. 30 टक्के रुग्णांवर प्रभाव करणाऱ्या नियमाबद्दल प्रशासनाला अगोदर माहीती का द्यावी वाटली नाही. नव्याने आलेले शासन एक रुपयात तपासणी अन्‌ दहा रुपयात जेवन देण्याचा मानस व्यक्त करत असतांना त्याविरोधात आताच का हा निर्णय घेतला. या बद्दल विविध तर्कवितर्क लढवल्या जात आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांत एकाही राजकीय पक्षाने आक्षेप नोंदवला नाही हे विशेष. 

तीस टक्के रुग्ण हे विविध प्रकारच्या सवलतीमुळे नोंदणी शुल्क भरत नसल्याने एचएमआयएस या संकणकीय नोंदणीसाठी येणारा प्रति रुग्ण सहा रुपयांचा खर्च निघत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मात्र, बेवारस आणि अपघाती रुग्णांबाबत अडचण होणार नाही याची दक्षता घेवू. केवळ नोंदणी शुल्क आकारले जात आहे. पण सवलत असणाऱ्यांना उपचार मोफत सुविधा मिळेल. 
-डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधिक्षक, घाटी रुग्णालय, आैरंगाबाद. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Removal of Registration fee exemption at Aurangabad Ghati Hospital earns Ten Thousand a day