राज्य कर्करोग संस्थेच्या फायलींची झटकली धूळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

राज्य कर्करोग संस्थेच्या बांधकामाचे 31.07 कोटींचे काम "एसएससीसी' या केंद्र शासनाच्या अंगिकृत कंपनीला मिळाले आहे; तसेच लिनॅक बंकरच्या 25 कोटींचा टर्न की प्रोजेक्‍टच्या निविदा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. ही दोन्ही कामे संयुक्तपणे पंधरा दिवसांत सुरू होणार आहेत. भूमिपूजन होऊनही हे काम रखडल्याचे "सकाळ'ने समोर आणले होते. त्याची दखल घेत या रेंगाळलेल्या फायलींवरील धूळ झटकल्याने कामाला गती देण्यात आली आहे.

औरंगाबाद - राज्य कर्करोग संस्थेच्या बांधकामाचे 31.07 कोटींचे काम "एसएससीसी' या केंद्र शासनाच्या अंगिकृत कंपनीला मिळाले आहे; तसेच लिनॅक बंकरच्या 25 कोटींचा टर्न की प्रोजेक्‍टच्या निविदा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. ही दोन्ही कामे संयुक्तपणे पंधरा दिवसांत सुरू होणार आहेत. भूमिपूजन होऊनही हे काम रखडल्याचे "सकाळ'ने समोर आणले होते. त्याची दखल घेत या रेंगाळलेल्या फायलींवरील धूळ झटकल्याने कामाला गती देण्यात आली आहे.

राज्य कर्करोग संस्थेचा केंद्र व राज्य शासनाचा 96.70 कोटींचा हा प्रकल्प आहे. यामध्ये किरणोपचार विभागाच्या विस्तारीकरणाच्या 31.07 कोटींच्या बांधकामाला मेमध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. यात सध्याच्या इमारतीवर एक मजला बांधण्यात येणार आहे. लिनॅक यंत्र व बंकरचा टर्न की प्रोजेक्‍ट 25 कोटींचा असून हाफकिन महामंडळाकडून त्याची निविदा प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे. लिनॅक बंकरवर दोन मजले बांधण्यात येणार आहेत.

बांधकामाचे कंत्राट मिळालेली कंपनी निश्‍चित झाल्यानंतर राज्य कर्करोग संस्थेचा डीपीआर मागवेल. त्यानुसार कार्यादेश मिळाल्यानंतर बांधकाम सुरू होईल. या संयुक्त बांधकामातून कर्करोग रुग्णांसाठी वाढीव 165 खाटांची व्यवस्था निर्माण होणार आहे. याविषयी वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख यांनी निविदा खुल्या झाल्याचे सांगत प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करणारे टाटा कर्करोग रुग्णालयाचे डॉ. कैलास शर्मा हे या प्रकल्पासाठी पाठपुरावा करीत असून, लवकच बांधकाम सुरू होईल, असा विश्‍वास अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केला. 

लिनॅक किरणोपचाराचे यंत्र व त्याच्या बंकरचे बांधकाम हा टर्न की प्रकल्प आहे. त्याचे 25 कोटींचे टेंडर हाफकिनने फ्लोट केले होते. त्यात आलेल्या दोन्ही कंपन्यांचे बीडिंग होऊन कंपनीची निश्‍चिती लवकरच होईल. त्या बंकरवरही दोन मजले बांधकाम प्रस्तावित आहेत. त्यामुळे ती कंपनी व किरणोपचार विभागाच्या विस्तारीकरणाची निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असून, निश्‍चित झालेली कंपनी व टर्न-की प्रकल्प मिळालेली कंपनी येत्या 15 दिवसांत औरंगाबादमध्ये भेट देतील. त्यानंतर संयुक्त काम सुरू करतील. - डॉ. कैलास शर्मा (सल्लागार, राज्य कर्करोग संस्था तथा टाटा रुग्णालय, मुंबई)

Web Title: remove Dust of state cancer organization files