दानवे यांच्या पाठाने पदाधिकाऱ्यांत नवचैतन्य

Nanded News
Nanded News

नांदेड ​ : मराठवाड्याच्या प्रश्नांकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष होत असल्याने मराठवाड्याचा विकास होऊ शकला नाही. परिणामी, आपल्याकडूनही दुर्लक्ष झालेले असून, मराठवाड्याचे काय प्रश्‍न आहेत? याचा सर्व आमदार व खासदारांनी एकत्रित येऊन चर्चा करावी. त्याचा अहवाल तयार करून आगामी काळात या प्रश्‍नांचा पाठपुरावा करण्याचा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विद्यमान आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांना दिला.

अवेळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने, शेतकरी हैराण झालेला आहे. मराठवाड्यात याचे प्रमाण जास्त आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी श्री. दानवे शनिवारी (ता.१६ नोव्हेंबर) नांदेड दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांनी अर्धापूर तालुक्यात जावून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. ‘काळजी करू नका, लवकरच तुम्हाला मदत’ मिळेल अशी ग्वाही देवून ते नांदेडला पोचले. येथे येवून त्यांनी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरी सदिच्छा भेट देवून नाष्टा घेतला. तेथून भाजपचे प्रदेशउपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्याही घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली. तेथे भोजन करून आनंदनगर येथील राजमॉल येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते उपस्थित होते. 

पदाधिकाऱ्यांचे टोचले कान

या बैठकीमध्ये श्री. दानवे यांनी विद्यमान आमदार, खासदारांसह माजी आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. झाले गेले विसरून अंतर्गत सर्व भेदाभेद दूर सारून पक्षवाढीकडे आता लक्ष द्यावे.  मराठवाड्यातील सर्व आमदार आणि खासदारांनी एकवेळा एकत्र बसून मराठवाड्याच्या प्रश्‍नांसंदर्भात विचारविनिमय करण्याची आता वेळ आली आहे. या चर्चेमध्ये माजी आमदार - माजी खासदारांना तसेच विषय तज्ज्ञांनाही बोलावून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. मराठवाड्यासाठी काय करता येण्यासारखे आहे? कोणत्या समस्या प्रभावीत आहेत? याचा अभ्यास करावा. हे सर्व प्रश्‍न धसास लावण्यासाठी पाठपुरावा करणे पुढच्या काळामध्ये आवश्‍यक झालेले आहे. सिंचन, रस्ते, कृषी, नागरी समस्या असे असंख्य प्रश्‍नांकडे आपले दुर्लक्ष झालेले आहेत. हे सर्व प्रश्‍न आगामी काळात आपल्याला पूर्ण करावयाचे असून, त्यासाठी मतभेद करू नये असा कानमंत्रही श्री. दानवे यांनी या बैठकीमध्ये दिला आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असणार

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर श्री. दानवे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.  वीसपेक्षा अधिक दिवस होऊन देखील राज्यसरकार स्थापन होऊ शकले नाही, याविषयी बोलताना श्री. दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढले. जनतेनेही युतीला बहुमत दिले. त्यामुळे या जनादेशाचा आदर भाजपसह मित्र पक्षांनी केला पाहिजे. पण असे न करता शिवसेनेने निकालाच्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन ‘सेनेला अन्य पर्याय मोकळे आहेत’ असे जाहीर करून टाकले. त्यांचा एकच हट्ट आहे, तो म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा. वास्तविक पाहता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या फार्म्युल्यानुसारच आजवर युती टिकून आहे. यापुढेही टिकून राहिल.  शिवसेनेने युती तोडलेली आहे. आम्ही तोडली नाही. त्यामुळे ही युती पुढेही टिकून राहीलच. मात्र, मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असणार. कारण महाराष्ट्राला भाजपशिवाय पर्याय नाही, असेही श्री. दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  अशी स्पष्टोक्तीही श्री. दानवे यांनी दिली.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com