अहवाल सकारात्मक, परवानगी बाकी; परभणीकरांची याबाबत थट्टा...

civil pbn
civil pbn

परभणी ः जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजूरीचे अजूनही भिजत घोंगडे कायम आहे. या बाबतीच कुठल्याच हालचाली होत नसल्याने या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार की नाही ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या महाविद्यालयाच्या मंजूरीसाठी आता कोणता पुढारी गांभीर्याने पुढे येताना दिसत नाही. जनताही बेफिकीर असल्याचे स्पष्ट होत आहे. महाविद्यालय निर्मितीचा अहवाल सकारात्मक तर परवानगी बाकी असल्याने परभणीकरांची याबाबत अद्याप थट्टाच झाल्याचे दिसून येते.    


जिल्हा तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही संकल्पना समोर आल्यानंतर परभणी जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळण्याची आशा येथील नागरिकांना लागून राहिली होती. त्यानुसार खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन उभारले होते. यातून थेट केंद्रीय उच्च शिक्षण मंत्री व वैद्यकीय व उच्च शिक्षणमंत्र्यापर्यंत हा आवाज उठविण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्वस्तरातील नागरिक, डॉक्टर, वकील, शिक्षक व इतरांनी या जनआंदोलनात आपले योगदान दिले होते. परंतू कालांतराने हे आंदोलन बंद पडले. 

अहवाल सकारात्मक पण कृती नाही 
खासदार संजय जाधव यांनी आपण जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जोपर्यंत होणार नाही तो पर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे ही घोषित केले होते. या आंदोलनाची दखल घेवून राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन करून परभणी येथील जिल्हा रुग्णालयाची पाहणी देखील केली होती. रुग्णालयासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा व जागेची देखील पाहणी या समितीच्यावतीने करण्यात आली होती. त्यानंतर या समितीने त्यांचा अहवाल राज्य शासनाकडे दाखल केला आहे. हा अहवाल सकारात्मक असून लवकरच या महाविद्यालयास परवानगी मिळू शकेल असे आश्वासन राज्यस्तरावरून देण्यात आले होते. परंतू त्यानंतर कुणीही या विषयावर बोलण्यास तयार नाही. हळूहळू हा विषय आता मागे पडू लागला आहे. परंतू, अजूनही सर्वसामान्य नागरिकांच्या मनातून हा विषय संपला नसला तरी ते बेफिकीर असल्याचे दिसून येत आहेत. 

खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी सुरू 
परभणी येथे खासगी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेले आहे. परभणीचे आमदार डॉ. राहूल पाटील यांचे हे महाविद्यालय असून त्याची पायाभरणी सुध्दा झाली आहे. अद्ययावत व भव्य इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. लवकरच या वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण होउन ही इमारत वैद्यकीय शिक्षणासाठी खुली केली जाईल. 

अद्याप कोणत्याही सूचना नाही 
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही सूचना जिल्हा रुग्णालयास आलेल्या नाहीत. अजून त्या बाबतची कोणतीही हालचाल नाही. - डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा शल्यचिकित्सक, परभणी 

(संपादन ः राजन मंगरुळकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com