घर बांधायचे राहुनी गेले...

संदीप काळे
शनिवार, 13 एप्रिल 2019

दुष्काळात समस्या होरपळल्या
खमरुद्दीन आपल्या पोटाला चिमटा देत मुलांना शिकवतोय, पण शाळा आकारणारी फी त्याला न परवडणारी आहे. गावातसुद्धा ५० आणि ६० हजार रुपये फी आकारली जाते; यावर कुणाचे नियंत्रण नाही. गेल्या दहा वर्षांपासून वीट बनवणाऱ्या शेख खमरूद्दीनसमोर येणारे दोन महिने मोठे संकट उभे आहे. परभणीत दुष्काळात असे अनेक विषय होरपळून निघाले आहेत. यापैकी कुठलाही विषय निवडणुकीच्या प्रचारसभेत येत नाही.

सूर्य डोक्‍यावर आला की अंगाची आपोआप आग होते, हे परभणीतले चित्र. जगात ‘जर्मनी’ आणि भारतात ‘परभणी’ असे परभणीचे वर्णन मी ऐकले होते; पण परभणीची ओळख नेता नसलेली आणि दुष्काळग्रस्त अशी दिसली. शहरात तेवढे निवडणुकीचे चित्र. मोठ्या सभेलाही जेमतेमच माणसे. येथे सग्यासोयऱ्याचे वातावरण निवडणुकीतून अधिक रंगत भरताना दिसून येते. विकास असतोच कुठे, हे पाहायचे असेल तर परभणीत या; तुम्हाला उदाहरण मिळेल.

रोजगाराच्या शोधार्थ
मी आणि माझा सहकारी विकास जाधव आम्ही जांब फाट्यावर थांबलो. या फाट्यावर शंकर दुधाटे नावाच्या तरुणाचे एक छोटेसे हॉटेल होते. आम्ही शंकरला थोडे बोलते केले, त्याच्या बोलण्यातून अनेक विषय पुढे आले. शंकर आठवी शिकलेला; म्हणून त्याने गाव सोडायची हिंमत केली नाही. शंकरच्या वयाची सारे तरुण मुले कामासाठी पुणे जवळ करतात. विकास नावाचा प्रकार गावात दिसतही नाही. याचे अनेक किस्से शंकरने आम्हाला सांगितले.

बांधकाम व्यवहार ठप्प 
राहाटीजवळ नजर जाईल तिथपर्यंत विटा तयार करून ठेवल्या होत्या. वीट कारखान्याजवळ आमची गाडी थांबली. शेख खमरूद्दीनने गेल्या दोन वर्षांपासून पूर्णपणे ठप्प असणाऱ्या धंद्याविषयी सांगितले. कित्येक लोकांनी विटा घेण्यासाठी आगाऊ पैसे दिले; पण दोन वर्षे झाले तरी विटा नेल्या जात नाही. दुष्काळाचे कारण सांगून वाळूचा उपसा पूर्णपणे बंद आहे. खिशात रुपये खेळते नसल्यामुळे बाजारातून घर बंधण्यासाठी जाणारा माल जाग्यावरच पडून आहे. 

हजारो हात रिकामे 
बांधकामावर राबणारे हात पोट भरण्यासाठी पुणे-मुंबईकडे वळले आहेत. वाळूच्या लिलावातील दिरंगाई, नोटाबंदी, जीएसटी असे अनेक कारणे आहेत. ज्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अनेकांना घर बांधायचे राहून गेले आहे. घर बांधले नाही म्हणून कुणाचे लग्न राहिले, कुणाच्या आई-वडिलांना छप्पर बांधून देण्याचे स्वप्न अधुरे राहिले; तर कुणी हक्काच्या घरापासून वंचित आहे.

Web Title: reporter diary sandeep kale