इथे दुष्काळ पाचवीलाच पुजलेला..

संदीप काळे
बुधवार, 17 एप्रिल 2019

मराठवाड्यात प्रचारासाठी सर्वांत आघाडी घेतलेला जिल्हा कुठला असेल तर तो बीड आहे. तसेच, मराठवाड्यात सर्वांत जास्त दुष्काळ कुठे असेल तर तो बीडमध्ये. जिकडे जावे तिकडे मुंडेच मुंडे... दोन प्रतिस्पर्धी पक्ष; ज्यांचे प्रमुख मुंडेच आणि मी ज्या ज्या लोकांच्या घरात जात होतो, तिथे लोकांच्या देवघरात गोपीनाथ मुंडे यांचा फोटो...

मराठवाड्यात प्रचारासाठी सर्वांत आघाडी घेतलेला जिल्हा कुठला असेल तर तो बीड आहे. तसेच, मराठवाड्यात सर्वांत जास्त दुष्काळ कुठे असेल तर तो बीडमध्ये. जिकडे जावे तिकडे मुंडेच मुंडे... दोन प्रतिस्पर्धी पक्ष; ज्यांचे प्रमुख मुंडेच आणि मी ज्या ज्या लोकांच्या घरात जात होतो, तिथे लोकांच्या देवघरात गोपीनाथ मुंडे यांचा फोटो... मी बीडमध्ये काही मित्रांना भेटलो आणि ग्रामीण भागात काय प्रश्न आहेत, हे समजून घेऊन गावाच्या दिशेने निघालो. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून सर्वांना परिचयाचा. जिल्ह्यात शिक्षणाचे खूप कमी प्रमाण; त्यामुळे मराठवाड्यात सर्वात जास्त गुन्हेगारीचे प्रमाण बीडमध्ये आहे. बीडला नेते खूप आहेत; पण ते गरिबांसाठी नाहीत अशी इथली अवस्था आहे. 

पाटोदा तालुक्‍यातल्या पारगाव घुमरा या गावात पोहोचलो. या गावात काही तरुण मित्रांना भेटलो. त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची प्रचंड ऊर्जा होती. यांच्याकडे डिग्री आहे; पण तिचा कुठलाही व्यवसाय टाकण्यासाठी उपयोग नाही. तोहीत शेख सांगत होता, ‘‘आमच्या संसाराचा गाडा माझी आई बांगड्या विकून चालवते. मला वडील नाहीत, त्यामुळे मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेजण माझ्या आईला मदत करत असतो. उन्हाळ्यातले चार महिने दुष्काळी स्थितीमुळे लोकांच्या हाताला काम नसते, उसनेपासने करून दिवस पुढे नेण्याचे काम आम्ही करतो.’’ 

याच गावातल्या धनंजय येवलेंनी नोकरी लागणारच नाही हे लक्षात आल्यावर दुधाचा व्यवसाय सुरू केला; पण गेल्या वर्षभरापासून चारा नसल्यामुळे दुभती जनावरे विकायची वेळ धनंजयवर आलीय. आम्हा ग्रामीण भागातील तरुणांचा सर्वजण निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून वापर करतात.’’ याच गावातल्या उच्चशिक्षित वैभव भोसले यांना पात्रता असतानाही प्राध्यापक म्हणून नोकरी मिळत नाही. आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी वैभव यांनी खासगी संस्थेत तासिका तत्त्वावर शिकवणीला सुरवात केली आहे. 

निवडणुकीत गरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न कधी चर्चेला जात नाही. बहीण म्हणते भाऊ लुटारू आणि भाऊ म्हणतो बहीण खोटारडी! यापलीकडे बीडमध्ये राजकारण नाही, अशा बोलक्‍या प्रतिकिया बीडमध्ये मी ऐकत होतो.

Web Title: Reporter Diary Sandeep Kale Drought Beed Marathwada