सरपंचाने रात्री कटींग-दाढी करायला लावली आणि... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

सरपंचचांच्या हस्ते ध्वजवंदन होत असताना सर्वच प्रमुख आजूबाजूला उभे राहायचे.आम्ही मात्र कुठंतरी बाजूला उभे राहतो. परंतु सरपंच शैलेंद्र पवार यांनी काल नवीन कपडे घेऊन दिले. रात्री कटींग-दाढी करायला लावली आणि सकाळी लवकर येऊन माझ्या हस्ते ध्वजवंदन करायचे आहे, असे सांगितले. मला विश्वास बसला नाही.

तीर्थपुरी (जालना) : तीर्थपुरी येथील ग्रामपंचायतीत ज्येष्ठ सफाई कामगार लक्ष्मण नामदेव कासार यांनी तब्बल अठ्ठावीस वर्ष गावाची सेवा केली. त्यांचा सन्मान गावाने अनोख्या पद्धतीने केला. प्रजासत्ताक दिनी त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

गावातील सफाई करण्यासाठी कामगार मिळत नसल्याने येत्या काळात ग्रामपंचायतीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सफाई कामगार मिळत नसल्याने ग्रामस्थांना स्वतःच घरासमोरील नाली साफ करण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस सफाई कामगाराचा तुटवडा निर्माण होत असला, तरी येथील सफाई कामगार लक्ष्मण कासार निःसंकोचपणे सफाई करतात. अशा कामगाराचा सन्मान व्हावा यासाठी त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

वाचा - या कारणांनी खालावत आहे शुक्राणूंची गुणवत्ता  

ग्रामस्थांनीही उत्साहाने या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तम पवार, माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, सरपंच शैलेंद्र पवार, पंचायत समितीचे सदस्य रमेश बोबडे, चेअरमन रामप्रसाद बोबडे, शिवाजीराव बोबडे, तुषार पवार, अंकुशराव बोबडे, ग्रामविकास अधिकारी गजानन मुपडे, तलाठी श्री.कुरेवाड, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर कडूकर, घनश्याम चिमणे, बबन गाडेकर, सुभाष चिमणे, संतोष बोबडे, रवींद्र बोबडे,  व ग्रामस्थ उपस्थीत होते. 

लोकांचा सफाई कामगारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. वर्षभर गावातील नालीची सफाई करायची, राष्ट्रीय सण आला, की पहाटे उठून ग्रामपंचायतची साफसफाई करायची. सरपंचचांच्या हस्ते ध्वजवंदन होत असताना सर्वच प्रमुख आजूबाजूला उभे राहायचे.आम्ही मात्र कुठंतरी बाजूला उभे राहतो. परंतु सरपंच शैलेंद्र पवार यांनी काल नवीन कपडे घेऊन दिले. रात्री कटींग-दाढी करायला लावली आणि सकाळी लवकर येऊन माझ्या हस्ते ध्वजवंदन करायचे आहे, असे सांगितले. मला विश्वास बसला नाही. मी ग्रामपंचायतीला आलो आणि माझा मान सन्मान करून माझ्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. त्यामुळे मला खूप आनंद झाला. एखाद्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही एवढे समाधान मिळणार नाही, एवढे समाधान मला मिळाले.
- लक्ष्मण कासार, सफाई कामगार, तीर्थपुरी, ता. अंबड, जि. जालना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic Day Flag Hosting By Sanitation Worker Jalna News