
लातूर - येथे एका लग्न समारंभासाठी आलेल्या निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षकांची कारची काच फोडून चोरट्यांनी 25 हजार रुपये व एक चेकबुक चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता. 20) घडली. पण, या घटनेनंतर अंबर दिव्याची चर्चा मात्र सुरू झाली आहे. सेवानिवृत्त अधिकाऱयाच्या कारवर अंबर दिवा कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, याचे उत्तरही
पोलिसांकडे नाही.
निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव हे बुधवारी एका लग्नासाठी येथे आले होते. त्यांनी कार (क्रमांक एमएच 12-पीएऩ 9843) ही सोबत आणली होती. रिंगरोड परिसरात असलेल्या मंगल कार्यालयात हा लग्न समारंभ होता. लग्न लागल्यानंतर श्री. जाधव, त्यांचे कुटुंबीय व त्यांचा चालक प्रवीण बांदल हादेखील जेवणासाठी कार्यालयात गेला. कारमध्ये
कोणीच नाही हे पाहून चोरट्यांनी कारच्या मागच्या बाजूची काच दगडाने फोडली.
आतमधील बॅग घेऊन ते पसार झाले. जाता जाता त्यांनी या बॅगमधील 25 हजार रुपये व एक चेकबूक नेले. तसेच इतर कागदपत्र असलेली ही बॅग नालीत टाकून चोरटे निघून गेले. जेवण झाल्यानंतर चालक बांदल हा कारजवळ आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पण, खरी चर्चा श्री. जाधव यांच्या कारमध्ये असलेल्या अंबर दिव्याची होत आहे.
पोलिसांनी घेतली नाही फारशी दखल
श्री. जाधव हे निवृत्त अधिकारी आहेत. असे असताना त्यांच्या कारमध्ये अंबर दिवा कसा आला? त्यांना असा दिवा ठेवण्याची शासनाने परवानगी दिली आहे का? निवृत्त अधिकाऱयांना असा दिवा वापरण्याची परवानगी असते का?, खासगी कारमध्ये अंबर दिवा ठेवता येतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित करून पोलिस चर्चा करीत आहेत. खरे तर घटनास्थळाला अनेक
वरिष्ठ अधिकाऱयांनी भेटही दिल्या. हा दिवा पाहून ते आश्चर्य चकितही झाले. मात्र, श्री. जाधव हे वरिष्ठ निवृत्त अधिकारी असल्यानेही त्यांनी याची फारसी दखल घेतली नसल्याचेच दिसून आले.
काय म्हणता - प्लेगची महामारी पुन्हा येणार?
असं कसं झालं हो - संसाराचा डाव सुरू होण्यापूर्वीच मोडला..