बाळासाहेब ठाकरेंना न्याय देणारे निवृत्त न्यायाधीश 'वंचित'कडून इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांना न्याय मिळवून दिला, आजवर आपणही न्यायदानाच्या माध्यमातूनही तेच करत आलो, आता राजकीय माध्यमातून न्याय देण्याचे कार्य करण्यासाठी 'वंचित'कडे आलो असल्याचे कांबळे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

औरंगाबाद : तब्बल 28 वर्षे न्यायदानाचे कार्य केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावरुन निवृत्त झालेले बी. पी. कांबळे हे 'वंचित बहूजन आघाडी'तर्फे विधानसभा निवडणूकीसाठी औरंगाबाद पश्‍चिममधून इच्छूक असून शनिवारी (ता. 27) इच्छूकांच्या मुलाखतीला ते हजर राहिले होते. 

बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांना न्याय मिळवून दिला, आजवर आपणही न्यायदानाच्या माध्यमातूनही तेच करत आलो, आता राजकीय माध्यमातून न्याय देण्याचे कार्य करण्यासाठी 'वंचित'कडे आलो असल्याचे कांबळे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

बी. पी. कांबळे यांनी 1963 ते 1967 दरम्यान मिलींद कॉलेज ऑफ सायन्समधून शिक्षण घेतले. 1967 ते 1969 एमपी लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून 1971-72 दरम्यान एलएलएम पदवी. एक वर्ष आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा केली. 1976 मध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून मुंबईत सेवेस सुरवात केली. 1978 ते 80 दरम्यान संगमनेर व अकोले तालूक्‍यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी. पुणे येथे 1980 ते 83 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर (सिव्हील), 1983 ते 1990 दरम्यान (तत्कालीन) लघूवाद न्यायालयात नियुक्ती, 1990 ते 2003 पर्यंत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, 2004 या वर्षी अतिरिक्त मुख्य लघूवाद न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून काम पाहिले. 

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी असताना 5 जुलै 2000 रोजी एका प्रकरणात  प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांना जातीय तेढ वाढेल असे चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या कारणावरुन भोईवाडा कोर्टात बी. पी. कांबळे यांच्या समोर हजर करण्यात आले होते. न्या. कांबळे यांनी कै. बाळासाहेब ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्या प्रकरणाची शहानिशा करुन बाळासाहेबांना मी डिस्चार्ज (दोषमुक्त) केलं होत. मी केलेली ही ऑर्डर हायकोर्टानेही तपासून तेच आदेश दिले होते. न्यायाधीश परिक्षा दिल्यानंतर न्यायाधीश झालो.

न्याय मिळवून देणार
न्यायादानाच्या खुर्चीत असतानाही गोरगरिबांची सेवाच केली. काहींना कायद्याचे ज्ञान नसते, त्यामुळे वाईट वागणूक मिळते अशांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले. बाबासाहेबांचे ऋण फेडायचे आहे, त्यांचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे. आपल्या हक्काची जाणीव करुन देणे, न्याय मिळवून देणे हेच आजवर करत आलो आता राजकीय माध्यमातूनही न्याय देण्याचे कार्य करण्याची इच्छा आहे, असे कांबळे यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired judge will contest from Vanchit Bahujan Aaghadi