गावचे सैनिक सेवानिवृत्त झाले, ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरविले....

वाघाळा (ता. अंबाजोगाई) गावातून निवृत्त सैनिकांची सजवलेल्या बैलगाडीत अशी मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला. 
वाघाळा (ता. अंबाजोगाई) गावातून निवृत्त सैनिकांची सजवलेल्या बैलगाडीत अशी मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला. 

अंबाजोगाई (जि. बीड) - भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना अभिमान असतो. वाघाळा (ता. अंबाजोगाई) येथील चार सैनिक वर्ष 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी बुधवारी (ता. एक) नववर्षाच्या स्वागतालाच या चारही जवानांची ग्रामस्थांनी बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली.

गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या हेतूने निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे सरपंचासह ग्रामस्थांनी ठरविले होते. त्यासाठी नववर्षाचा दिवस निवडला. गावातील सुभेदार गोविंद बनकर, सुभेदार गोविंद जाधव व लेफ्टनंट बाळासाहेब शिंदे हे तीन जवान सरत्या वर्षात निवृत्त झाले. सुभेदार भरत जाधव हे पाच वर्षांपूर्वीच निवृत्त झाले. या चौघांची थाटात मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला. 

वाजत-गाजत मिरवणूक 
निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढण्यासाठी सकाळीच बैलगाडी सजवण्यात आली. बैलांच्या अंगावर आकर्षक झुली घालून त्यांनाही सजवण्यात आले. बघता-बघता गावच्या मंदिरासमोर सर्व ग्रामस्थ व महिला जमा झाल्या.

निवृत्त तीन जवान गणवेशात बैलगाडीत बसले. ग्रामस्थांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले. "भारत माता की जय' असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने गावात ही मिरवणूक निघाली. बैलगाडीवर ध्वज पताकाही लावण्यात आल्या. गावच्या सभागृहात मिरवणूक पोचल्यानंतर देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी या सैनिकांचे औक्षणही केले. 

असा झाला सन्मान 
गावच्या सभागृहात या चारही निवृत्त सैनिकांचा सपत्नीक सत्कार झाला. यावेळी केशव महाराज भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी रंगनाथ लोमटे होते. पोलिस पाटील केशवराव लोमटे, ग्रामसेवक एस. एस. सौदागर, मुख्याध्यापक कांबळे, उपसरपंच मंचकराव जाधव यांची उपस्थिती होती.

वेळी पाहुण्यांच्या हस्ते सर्व जवानांसह पत्नीसह सन्मान झाला. या सैनिकांनी भावना व्यक्त केल्या. सरपंच संतोष भगत यांनी गावातील युवकांनी हा आदर्श समोर ठेवून देश रक्षणासाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. सरकारी अभियोक्ता बी. एम. लोमटे यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली. प्रा. संजय हजारे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 


माझ्या मातीत आपुलकीने माझा सन्मान झाला, याचा गर्व नक्कीच आहे. भारतीय सैन्य दलातील गुप्तचर विभागात चांगली सेवा देता आली, याचा अभिमान आहे. 
गोविंद जाधव, सुभेदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com