निवृत्त शिक्षकाने हातपंपाच्या पाण्यावर फुलवली आंब्याची बाग

झाडांना घागरीने पाणी देतांना विठ्ठल पांढरे
झाडांना घागरीने पाणी देतांना विठ्ठल पांढरे

बेलकुंड, (जि. लातूर) ः औसा तालुक्‍यातील बेलकुंड येथील विठ्ठल पंढरीनाथ पांढरे या 82 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने आपल्या साडेतीन एकर क्षेत्रावर शंभर आंब्याच्या झाडांची लागवड करून स्वतः खांद्यावर घागर घेऊन हातपंपाच्या पाण्यावर ही झाडे वाढविली. यातून आर्थिक उत्पन्नाची अपेक्षा न ठेवता आंबे पाहुणे आणि शेजाऱ्यांना देऊन नात्यात आंब्याचा गोडवा कायम ठेवला आहे . 


बेलकुंड येथे वर्ष 1938 मध्ये विठ्ठल पंढरीनाथ पांढरे यांचा जन्म झाला. घरची आर्थिक स्थिती हलाखीची असताना त्यांनी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या पांढरे यांना 1959 मध्ये हारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. 37 वर्षे अविरतपणे ज्ञानार्जनाचे कार्य केल्यानंतर वर्ष 1996 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर बेलकुंड येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शाळेत स्वखर्चाने बोअर घेतला. 


सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य शेतीतच व्यतीत करण्याचा त्यांनी निश्‍चय केला. 
शेतात जाऊन आपल्या साडेतीन एकर जमिनीवर त्यांनी वर्ष 1997च्या दरम्यान शंभर आंब्याच्या रोपांची लागवड केली. त्यानुसार आखणी करून साडेतीन एकरांत 30 बाय 15 फूट अंतरावर झाडे लावली. मात्र, येथे पाण्याची व्यवस्था नसल्याने शेतात एक बोअर घेतला. या बोअरलाही कमी पाणी लागले. त्यांनी बोअरला हातपंप बसवून घेतला. 


या हातपंपाच्या साहाय्याने मजूर न लावता स्वतः खांद्यावर पाण्याची घागर घेऊन त्यांनी ही झाडे मोठी केली. गेल्या काही वर्षांपासून या झाडांना मोहोर बहरत असून मोठ्या प्रमाणावर आंब्याचे उत्पादन होत आहे. आंब्याला चांगला भाव मिळत असतानाही हे आंबे बाजारात विक्री न करता पाहुणे आणि शेजारच्या लोकांना अगदी मोफत देतात. निवृत्तीनंतर अंगमेहनत करून आंब्याची बाग फुलवणारे विठ्ठल पांढरे यांचे 82 व्या वर्षीही आरोग्य ठणठणीत आहे. 

समाज घडविण्यामध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. मी वृक्षलागवडीचा छंद जोपासला आहे. आजच्या भीषण दुष्काळाचा सामना करायचा असेल तर प्रत्येकाने हा छंद जोपासला पाहिजे. 
- विठ्ठल पांढरे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com