महसूल विभागाकडे 97, तर कारखान्यात 40 मिलिमीटरची नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

रेणापूर(जि- लातूर): पानगाव (ता. रेणापूर) येथे बुधवारी (ता. 14) संध्याकाळी पाऊस झाला; परंतु तहसील कार्यालयाच्या पर्जन्यमापकात 97 मिलिमीटर, तर पन्नगेश्वर साखर कारखान्यावरील पर्जन्यमापकात 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे दोन पर्जन्यमापकांत 57 मिमी पावसाचा फरक येत असल्यामुळे नेमके कोणते खरे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात ग्रामस्थ एवढा पाऊस झालाच नसल्याचे म्हणत आहेत. हा पाऊस केवळ पानगाव शहरालगतच्या परिसरावरच झाला. शेजारील गावांत मात्र झाला नाही. 


रेणापूर तालुक्‍यात रेणापूर, पानगाव, कारेपूर, पोहरेगाव आणि पळशी असे पाच महसूल मंडळ आहेत. बुधवारी (ता. 14) या मंडळात झालेल्या पावसाची नोंद तहसील कार्यालयात झाली असून, यात रेणापूर 10 मिमी, पळशी 16 मिमी, कारेपूर 35 मिमी, पोहरेगाव 05 मिमी, तर पानगाव येथे 97 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तहसील कार्यालयाचे पर्जन्यमापक पानगाव येथे वैद्यनाथ बॅंकेच्या शेजारी कुलकर्णी यांच्या मोकळ्या जागेत बसविलेले आहे. या पर्जन्यमापकात 97 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. तर पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्यातील पर्जन्यमापकात 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

यामुळे दोन पर्जन्यमापकांत तब्बल 57 मिमी पावसाचा फरक येत आहे. यामुळे पानगावात याची उलटसुलट चर्चा होत आहे. पर्जन्यमापकातील पहिले पाणी न काढल्याने किंवा कोणाच्या तरी खोडसाळपणामुळे हा प्रकार घडला असेल, असे पानगाव सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मुन्ना गुर्ले आणि संचालक रामेश्वर मोटाडे यांचे म्हणणे आहे. पानगावात पाऊस झाला परंतु कमी प्रमाणात झाला असून शेताच्या बाहेरसुद्धा पाणी निघाले नाही. पर्जन्यमापकाचे मोजमाप घेणाऱ्याने चुकीची माहिती दिल्याचे शेतकरी रामभाऊ फुले म्हणाले.

पर्जन्यमापक हे खासगी जागेत ठेवले असून, तेथे कोणाचेही लक्ष नसते. यामुळे तलाठी कार्यालयाच्या वर हे पर्जन्यमापक बसवावे, असे पानगाव येथील शेतकरी गणेश वांगे म्हणाले. 
भंडारवाडी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक दहिफळे म्हणाले की, पानगाव महसूल मंडळात शेजारील अनेक गावांचा समावेश आहे. बुधवारी (ता. 14) झालेला पाऊस हा पानगाव आणि परिसरावरच झाला. शेजारील खेड्यांत फार कमी झाला; परंतु पानगावला झालेला पाऊस म्हणजे सर्व मंडळांत झालेला पाऊस, अशी नोंद शासनस्तरावर होते. ही पद्धत चुकीची आहे. रेणापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर पीकविम्याबाबत अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 

मी पानगाव येथे तलाठी कार्यालयात 12 वर्षांपासून काम करतो. पर्जन्यमापकाची नोंद कशी घ्यावी याबाबत मला मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी शिकवलेले आहे. मागील दहा वर्षांपासून मी पर्जन्यमापकाची नोंद घेऊन कळवतो. मात्र मी याचे प्रशिक्षण घेतलेले नाही. 
- राम गालफाडे, पानगाव 

 
पानगाव येथे पडलेल्या पावसाबाबत साशंकता उपस्थित केली जात आहे. याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल. 
- गोविंद येरमे, प्रभारी तहसीलदार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com