तांदळात जाळ्या अन्‌ गव्हात अळ्या! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

चापोली - तांदळाला जाळ्या आणि गव्हात अळ्या... घुशींनी खोल्यांची केलेली पोखरण... तब्बल तीन वर्षांपासून सरपणाचा खर्चही मिळत नसल्याने मेटाकुटीला आलेले कर्मचारी... हे चित्र आहे चापोलीतील अंगणवाड्यांचे. त्यामुळे चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

चापोली - तांदळाला जाळ्या आणि गव्हात अळ्या... घुशींनी खोल्यांची केलेली पोखरण... तब्बल तीन वर्षांपासून सरपणाचा खर्चही मिळत नसल्याने मेटाकुटीला आलेले कर्मचारी... हे चित्र आहे चापोलीतील अंगणवाड्यांचे. त्यामुळे चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

चापोली येथे सात अंगणवाड्या आहेत. शासनाकडून बालकांना पोषण आहार दिला जातो. यासाठी ठेकेदारामार्फत धान्याचा पुरवठा अंगणवाडीला केला जातो. मे 2016 मध्ये येथील सातही अंगणवाड्याना तांदूळ व गहू देण्यात आले होते. तब्बल एक वर्ष झाले तरी दुसरा पुरवठा अजूनही झाला नाही. तांदूळ व गव्हाला एक वर्षाच्या जवळपास काळ झाला असल्याने सध्या त्यात अळ्या होऊन जाळ्या लागल्या आहेत. याच धान्याची खिचडी चिमुकले सध्या खात आहेत. 

अंगणवाडीमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता अजून तीन ते चार महिने पुरेल एवढा गहू व तांदूळ शिल्लक आहे. अजून तीन ते चार महिने अशा प्रकारचे अळ्या व जाळ्या असलेले अन्न शिजवले जाणार असल्याने चिमुकल्यांच्या आरोग्याशीच खेळण्याचा प्रकार येथे घडत आहे. अशा प्रकारच्या शिजवलेल्या आहारामुळे जर भविष्यात काही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असेल, असाही प्रश्न यावेळी समोर येत आहे. 

सरपणाचे बिल अडकले 
खिचडी शिजवण्यासाठी लागणारे सरपणाचे बिल तब्बल तीन वर्षापासून निघाले नसल्याने खिचडी शिजवण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. उधारी, उसनवारीवर तीन वर्षापासून सरपण आणले जात आहे. याकडे अधिकारी कधी लक्ष देतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दुरुस्तीची आवश्‍यकता 
अंगणवाडीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून येथील वर्गखोल्यांत घुशींचा वावर वाढला आहे. घुशींनी फरश्‍या खिळखिळ्या केल्या आहेत. त्यामुळे चिमुकल्यांना व्यवस्थित बसण्याची सोय नाही. त्यामुळे येथील अंगणवाड्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. 

""धान्य येऊन जवळपास एक वर्ष झाल्यामुळे त्यात जाळ्या निर्माण झाल्या असतील. वरिष्ठांशी चर्चा करून यावर काही मार्ग काढता येईल का त्यासाठी प्रयत्न करू. तसेच अंगणवाडीमधे घुशींमुळे फरश्‍या खिळखिळ्या झाल्याची पाहणी केली आहे व ग्रामपंचायतीला दुरुस्तीसाठी कळवले आहे. सरपणाच्या बिलासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत.'' 
- ए. ए. शेख, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, चाकूर. 

Web Title: rice and wheat larvae

टॅग्स