अग्निशमन, रुग्णवाहिकांसाठी आता उजवी लेन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

औरंगाबाद  - वाढती वाहतूककोंडी तसेच काही वाहनचालकांच्या निगरगठ्ठपणामुळे आपत्कालीन काळात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने रस्त्यात अडकून पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. या वाहनांना वेळीच मार्गस्थ होण्यासाठी रस्त्यावरील काही चौक वगळता उजवी लेन आपत्कालीन वाहनांसाठी मोकळी ठेवण्याचा प्रयोग वाहतूक विभाग करीत आहे. 

अवयवदानावेळी ग्रीन कॉरिडॉर करण्याची वेळ वाहतूक विभागावर येते. खासकरून वाहतूककोंडीत तसेच सिग्नलवर रुग्णवाहिकांना थांबलेल्या वाहनधारकांकडून रस्ता दिला जातोच असे नाही. परिणामी, यातून अनुचित प्रकार घडतात. रुग्णवाहिकेतील रुग्णाच्या प्रकृतीलाही धोका संभवतो. त्यामुळे वाहतूक विभागाने रहदारीसाठी मुख्य रस्त्यावर आपत्कालीन वाहनांना स्वतंत्र लेन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘राईट साईड लेन फॉर इमर्जन्सी व्हेईकल’ हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून महत्त्वाच्या रस्त्यांवर फलक लावले जात आहेत; तसेच रुग्णवाहिका चालकांना प्रशिक्षण देऊन सिग्नलजवळ उजव्या बाजूनेच रुग्णवाहिका चालविण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. 

अग्निशमन दलासह पोलिसांच्या आपत्कालीन वाहनांसाठीही ही लेन उपयोगात आणली जाईल. जालना रस्त्यावर वारंवार कोंडी होण्याचे प्रकार घडतात. मुख्यत्वे करून याच मार्गावरून रुग्णवाहिकांचा प्रवास असतो. या लेनचा उपयोग झाल्यास रुग्णवाहिकांसह आपत्कालीन वाहनांचा वेळ वाचला जाईल. रस्त्यातील अडथळ्यांच्या शर्यतीतून अशा वाहनांच्या चालकांची सुटका होईल.  

होणार मार्किंग
दूध डेअरी सिग्नल, तसेच आकाशवाणी येथील महात्मा बसवेश्‍वर चौकात मात्र उजव्या बाजूच्या लेनचा वापर करणे शक्‍य ठरणारे नाही. रस्त्यावर लेनबाबत मार्किंग होणार असून, दुभाजकांत पहिल्या टप्प्यात शंभर फलक लावले जातील, तसेच एकूण सुमारे साडेतीनशे फलक लावण्यात येतील, असे सहायक पोलिस आयुक्‍त सी. डी. शेवगण यांनी सांगितले.

Web Title: right lane for fire brigade ambulance