दंगलग्रस्त भागात भाजप करणार मदत - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

औरंगाबाद - 'शहरातील दंगलीची घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ही घटना का घडली? याच्या मुळाशी पोलिस जातील. त्यात जे दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सध्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. दंगलग्रस्त भागात भाजप कार्यकर्ते अंदाज घेत नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदत करणार आहेत,'' अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी रविवारी (ता. 13) पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील शहागंज, राजाबाजार परिसरात दंगलीमुळे मोठे नुकसान झाले. या परिसरात रविवारी खासदार रावसाहेब दानवे यांनी भेट घेत पाहणी केली.

दानवे म्हणाले, 'दंगलग्रस्त भागात पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शहरात जास्तीचे पोलिस पाठविण्यात आले आहेत. यामुळे शहरात आता शांतता आहे. दंगलग्रस्त भागात अनेक राजकीय नेते भेट देत आहेत. सर्वांनी शहरातील वातावरण बिघडणार नाही व शहर पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत,'' असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: riot affected area BJP help Ravsaheb Danve